नाशिककरांनो, मतदानाचा हक्क बजावा!
आज मतदान, जिल्ह्यात ४ हजार ९२६ केंद्रे
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 10:59:39
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : लोकशाहीचा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यासह जिल्ह्यात बुधवारी (दि. २०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण १९६ उमेदवार रिंगणात असून, सकाळी सात ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करता येईल.
जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत, तर ४ हजार ९२६ मतदान केंद्रांमधून मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हावासीयांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन शासकीय, प्रशासकीय याबरोबरच विविध संस्था-संघटना, तसेच खासगी आस्थापनांकडूनदेखील केले जात आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय प्रचार, आरोप- प्रत्यारोपांनी विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला होता. राजकीय पक्षांतील दिग्गजांच्या तोफा धडाडल्याने प्रचाराचा जोरदार धुरळा उडाला होता. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदानाकडे लक्ष लागून आहे. जिल्हा प्रशासनाने भयमुक्त मतदान प्रक्रिया पार पडावी, यासाठी जय्यत तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने २४ हजार २२५ मतदान अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर अधिकारी, कर्मचारी असे पाचजण नियुक्त असतील. त्यामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी १, २ व ३ तसेच शिपाई असेल. या पथकासोबत संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी, तसेच चालकासह शासकीय वाहन असेल. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महसूल विभाग व पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून सतर्क असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
गृहमतदान पूर्ण
जिल्ह्यात ८५ वर्षांवरील २ हजार ४४९ ज्येष्ठ, तसेच ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी पूर्वनोंदणी केली होती. गेल्या आठवड्यात पंधराही मतदारसंघनिहाय नियुक्त पथकांनी नोंदणी केलेल्या सर्व मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले. दरम्यान, जिल्ह्यात आठ हजार ७९६ सैनिक मतदार असून, त्यांच्यापर्यंत यापूर्वीच ईटीपीबीएमएस प्रणालीद्वारे मतपत्रिका पोहोच करण्यात आल्या आहेत. सैनिक मतदारांच्या मतपत्रिका या मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठच्या आत त्या- त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वीकारल्या जाणार आहेत.
मतदानासाठी हे पुरावे ग्राह्य
मतदार ओळखपत्र आधारकार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक/ पोस्टाने जारी केलेले फोटोसह असलेले पासबुक श्रम मंत्रालय योजनेंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅनकार्ड एनपीआरअंतर्गत आरजीआयद्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट फोटोसह पेन्शन दस्तावेज केंद्र/राज्य सरकार/लोक उपक्रम/पब्लिक लि. कंपनीद्वारा कर्मचारी यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र सांसद/विधायक / विधान परिषद सदस्य यांच्याकरिता जारी केलेले ओळखपत्र केंद्र सरकारच्या सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे दिव्यांगत्वाचे कार्ड (युनिक डिसॲबिलिटी आय डी)
संवेदनशील मतदान केंद्रे
नांदगाव : ०३ सिन्नर : ०२ चांदवड : ०१
३३०२ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग
जिल्ह्यातील तीन हजार ३०२ मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व एक हजार ६७६ मतदान केंद्रे व ग्रामीण भागातील पन्नास टक्के म्हणजे एक हजार ६२६ केंद्रांचे वेबकास्ट केले जाणार आहे. वेबकास्टिंग केल्या जाणाऱ्या मतदान केंद्रामध्ये नांदगावचे १७२, मालेगाव मध्य- ३४४, मालेगाव बाह्य- २५३, बागलाण- १४४, कळवण- १७४, चांदवड- १५३, येवला- १६४, सिन्नर- १६९, निफाड- १३९, दिंडोरी- १८७, नाशिक पूर्व- ३३१, नाशिक मध्य- ३०३, नाशिक पश्चिम- ४१३, देवळाली- २०६, तर इगतपुरीतील १५० केंद्रांचा समावेश आहे.
१०३ शॅडो मतदान केंद्रे
जिल्ह्यातील १०३ मतदान केंद्रे मोबाईल रेंजच्या बाहेर असल्याने त्यांना शॅडो केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी या केंद्रांतील अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी संबंधित केंद्रामधील माहिती वेळेत मिळण्यासाठी मदत होईल.
पोलिसांचा फौजफाटा
पोलीस आयुक्त, ४ उपायुक्त, ७ सहाय्यक आयुक्त
तीन हजार स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीपीबी) आठ कंपन्या
सीमा सुरक्षा बलाच्या (एसएसबी) तुकड्या
गुजरात राखीव पोलिसांची (जीआरपी) कुमक
मध्य प्रदेश, गुजरात येथील होमगार्ड
राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)
बंदोबस्ताचे नियोजन...
बूथ, शंभर मीटर, क्षेत्रीय गस्त, पोलीस ठाणेनिहाय गस्त
भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके
नियंत्रण कक्षातून प्रत्येक तासाला ‘अपडेट’
पोलीस आयुक्तालयात निवडणूक कक्ष
क्यूआरटी व स्ट्रायकिंग फोर्सच्या बंदोबस्तात ‘ईव्हीएम’ रवाना होतील
निवडणूक अधिकारी, निरीक्षकांना‘एस्कॉर्ट’
सोशल मीडियावर गस्तीसाठी स्वतंत्र पथक
शहराबाहेरील बंदोबस्त समन्वयासाठी स्वतंत्र पथक
एक लाख २१ हजारांवर नवमतदार
जिल्ह्यात १८ वयावरील एक लाख २१ हजार १०८ मतदारांची नोंदणी झाली असून, हे सर्व नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसे जिल्ह्यात ८० वर्षांहून अधिक वयाचे एक लाख २३ हजार ५३२ ज्येष्ठ मतदार आहेत. जिल्ह्यातील पुरुष मतदारांची संख्या २६ लाख १४ हजार ०९६ आहे तर महिला मतदारांची संख्या २४ लाख ४६ हजार ८६८ असून तृतीयपंथी मतदारांची संख्या १२१ आहे.
४५ मतदान केंद्रांत केवळ महिला कर्मचारी, दिव्यांग केंद्र
जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात तीन याप्रमाणे एकूण ४५ मतदान केंद्रांत सर्व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. ही सर्व केंद्रेच महिलांच्या हाती असतील. याव्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघातील एका केंद्रावर संपूर्णत: दिव्यांग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या केंद्रात मतदारांना आकर्षित करण्यासाठी सजावट केली जाणार आहे.
मतदान केंद्रातील सुविधा
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाकडून जिल्ह्यातील मतदान केंद्रांत विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. केंद्रात मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, पिण्याचे पाणी, सावलीकरिता व्यवस्था, दिव्यांगासाठी रॅम्प, ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असेल. तसेच महत्त्वाच्या केंद्रांत पाळणाघराची व्यवस्था असणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी केंद्राच्या परिसरात स्वयंंसेवक तैनात केले जातील. वैद्यकीय पथकांसह किटची व्यवस्था करण्यात येणार आहे.