कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने राडा

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 14:14:59

 लोकनामा प्रतिनिधी 

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात राडा झाला. सुहास कांदे यांची मतदारांना घेऊन चाललेली बस समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे सुहास कांदे समीर भुजबळांना संतापून म्हणाले. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. 
         नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आले. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.  काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो...आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका", असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला. यावर छगन भुजबळ म्हणाले की, कांदे यांच्या संबंधित व्यक्तीच्या शाळेत हजार लोक आणून ठेवले होते. सचिन मानकर हिस्ट्री शुटर तिथे पिस्तूल घेऊन आला. तुला मारून टाकेल, असे समीरला बोलला. पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि नंतर सोडून दिले. पोलीस असे वागत असतील तर कसे चालेल? मी एसपींना सांगितले आहे की, तुम्ही असे कराल तर तिथे खून पडतील. याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल, अशा रीतीने दादागिरी चालू असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला. 
           यावर सुहास कांदे म्हणाले की, काही ऊसतोड कामगार राज्यभर कामासाठी साखर कारखान्यावर कामाला जातात. ते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आले होते. त्यांच्या मुकादमाने त्यांच्य्साठी एकत्रित जेवणाची व्यवस्था केली होती. समीर भुजबळ व त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. त्या मतदारांच्या गाड्याही अडवल्या आणि फोडल्या. याबाबत माहिती मिळताच मी त्या ठिकाणी पोहचलो.  त्यावेळी समीर भुजबळांनी त्यांची गाडी आडवी घालून त्यांना त्यांना मतदानापासून रोखले जात होते म्हणून मी त्यांच्या मदतीला धावून गेलो. हे मतदार नसतील तर त्यांना अटक करा, असे मी आयोगाला सांगितले. यानंतर निवडणूक आयोगाने शहानिशा केली आणि मतदारांना सोडून दिले. 
 
मी नाव घेऊन धमकी दिली नव्हती
सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत विचारले असता सुहास कांदे म्हणाले की, समीर भाऊंचे नाव घेऊन मी धमकी दिली नाही, तिथे आमच्या एका माणसाला मारत होते, मी त्यांना म्हटले की त्याचा मर्डर होईल. एका मुकादमाकडे शंभर, दीडशे लोक काम करतात. नांदगाव तालुक्यातील सर्व मुकादमांनी मिळून एका ठिकाणी जेवण ठेवले होते, म्हणून ते लोक आले होते. नांदगाव विधानसभा मतदारसंघ मागासलेला आहे. ते मतदार ऊस तोडीला गेले होते, त्यांना वाटलं आपलं कर्तव्य निभवावं, म्हणून ते आले होतो.