मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिलेल्या नऊ शिक्षकांवर गुन्हा

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-20 16:15:47

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ अपडेट्‌स 

नाशिक – दिंडोरी येथे निवडणूक मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिलेल्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी येथे निवडणूकविषयक प्रशिक्षणासह कामास नऊ शिक्षक गैरहजर राहिले.  निवडणूक प्रक्रियेत या नऊ जणांनी कामकाजात विलंब, अडथळा निर्माण केला. गैरहजेरीविषयी  कार्यालयाकडे कुठलाही अर्ज, परवानगी पत्र सादर केलेले नाही. त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रमणध्वनी बंद करून ठेवला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      यामध्ये सुरगाणा येथील बागबारी केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे लक्ष्मण आहेर, सुरगाणा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे चंद्रकांत थविल, निफाड येथील के.जी.डी.एम. महाविद्यालयाचे महेंद्र पवार, चेतन कुंदे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे श्यामकुमार बोरसे, खर्डे येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिरामण सूर्यवंशी, चांदोरी येथील क. का. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाचे अमोल खालकर, जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेचे तारिक गणी, अलंगुन येथील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे मोहन चौधरी यांचा समावेश आहे.  दिंडोरीचे तहसीलदार वसंत धुमसे  यांनी ही  माहिती दिली.

कोकणात भानामतीचे प्रकार सुरुच

 राज्यात विधानसभा निवडणूक मतदानाची धामधूम सुरु आहे. मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पण दुसरीकडे महाडजवळील  बिरवाडी शहरात भानामतीचा प्रकार समोर आला आहे. बिरवाडीतील  एका रस्त्यावर मधोमध  लाल आणि काळ्या फडक्याने बांधलेली तीन मडकी तोंड बंद करून खाली नारळ अशा स्वरूपात हा भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आला आहे.  बिरवाडी आसनपोई रस्त्यावरील नाक्यावर आगदी मधोमध हा उतारा ठेवण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणी देवदेवस्की केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी हा सगळा प्रकार उधळून लावत ही मडकी फेकून दिली आहेत. कोकणात भानामती, अंधश्रद्धा, काळी जादू हे प्रकार पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ऐन मतदानाच्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळे गावात चर्चा आहे.