राजकारणाने गाठली खालची पातळी
शशांक केतकरची प्रतिक्रिया, मराठी कलाकारांनी केले मतदान
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 16:53:44
मुंबई :- महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची निवडणूक म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ कडे पाहिले जात आहे. पक्ष फोडाफोडी, सत्तेसाठी काहीपण करायची नेत्यांची तयारी, अंतर्गत गटबाजी, हायटेक प्रचार यामुळे ही निवडणूक गाजतेय. या निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेकडे सर्वसामान्य जनता जरी गांभीर्याने बघत नसली तरी संवेदनशील कलाकार, सुजाण नागरिक अत्यंत जागरुकतेने मतदान करताना दिसत आहेत. त्यातही मराठी कलाकारांनी या निवडणूकीचे महत्व जाणून मतदान केले आहे. मतदारांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदान केल्याचे फोटो सर्वच कलाकारांनी त्यांच्या सोशल मिडियावर शेअर करीत मतदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
आज दि.२० नोव्हेंबर रोजी मुंबईत सायली संजीव, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, राहुल देशपांडे, संजय ढोमे, शर्वरी वाघ, प्रशांत दामले, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे, मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, ऐश्वर्या नारकर,अभिजीत केळकर, मृण्मयी देशपांडे अविनाश नारकर, यांनी मतदानाचा हक्क बजावला. पण प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शशांक केतकरच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सध्याच्या राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली असल्याचे मत शशांकने मतदान केल्यानंतर व्यक्त केले. तसेच त्याने त्याच्या पोस्टमध्ये भारताची लोकसंख्या बघता शुद्ध हवा, शांतता, स्वच्छ परिसर, पाणी, खड्डे नसलेले मोठे रस्ते, शिक्षणाच्या उत्तम सोयी, उत्तम इस्पितळं, बागा, सुरक्षित समाज, शून्य भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्का, हाताला काम…२०२५ उजाडणार आहे. निदान या सामान्य गोष्टी तरी मिळू दे असा संदेश लिहून सामान्य जनतेचा, अधिकृत भारतीयाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. एकूणच कलाकारांमधील संवेदनशीलता यंदाच्या मतदान प्रक्रियेत प्रामुख्याने पाहायला मिळाली आहे.