मतदार आणि उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 18:26:17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ठळक घडामोडी
आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू
निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला . सुमन संतोष यादव असे मृत महिलेचे नाव असून त्या ३९ वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील ५ वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी आज नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक १ येथे होती. आज सकाळी सुमारे ६.३० वाजता, त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्या धावत्या रेल्वेखाली आल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमन यादव यांच्या आकस्मिक निधनाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मतदाराचा हृदयविकाराने मृत्यू
सातारा जिल्ह्यात मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे. शाम धायगुडे असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू
बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला . ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले.