एक्झिट पोलमध्ये कौल महायुतीला
भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 19:41:36
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सर्वांच्या नजरा २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र काही संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात सध्यातरी महायुतीला मतदारांनी कौल दिल्याचे संकेत मिळत आहेत. ४ पैकी तीन संस्थांकडून तीन संस्थांकडून महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज असून एका संस्थेनेच महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा येतील असा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील सर्व एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात महायुतीला ११८ ते १८६ जागा मिळण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला ६९ ते १५० जागा मिळतील असं या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे.
मॅट्रिजच्या एक्झिट पोल अंदाजनुसार राज्यात महायुतीला कौल देण्यात आला आहे. या अंदाजानुसार महायुती 150-170 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार देखील राज्यात महायुतीचे सरकार येण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. महायुती- 152-160 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार येण्याची चिन्हे असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी मुसंडी मारणार असे भाकित वर्तवण्यात आले आहे. इलेक्ट्रोल एजच्या पोलनुसार भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.भाजपाला 78 जागा मिळतील असे सूतोवाच यात करण्यात आले आहे.