कोण होणार नाशिक पश्चिमचा आमदार?

हिरे, बडगुजर, दिनकर पाटलांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त, उमेदवारांत धाकधूक

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 12:17:51

लोकनामा प्रतिनिधी
सिडको : नाशिक पश्‍चिम मतदार संघात पाच वाजेपर्यंत ५०.३९ मतदान झाले. २०१९ च्या निवडणुकीत ५४.२४ टक्के मतदान झाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत ५०.३९ टक्के मतदान झाले.  पश्‍चिम मतदारसंघात सकाळपासून मतदानाचा उत्साह जाणवत होता. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांनीही कंबर कसल्याचे दिसून आले.  विशेष म्हणजे, किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच या मतदारसंघात दोन औद्योगिक वसाहती असल्याने कंपनी कामगारांना मतदानासाठी जाता यावे, यासाठी अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना तीन तासांचा वेळ मतदानासाठी दिला होता.  
           नाशिक पश्‍चिम मतदारसंघात एकूण पंधरा उमेदवार रिंगणात होते. मात्र प्रमुख लढत भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे, शिवसेना ठाकरे गटाचे  सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांच्यात तिरंगी झाली. राज्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ अशी नाशिक पश्‍चिम मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात भाजपत बंडखोरी झाली. भाजपमधून बाहेर पडत दिनकर पाटील यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवत प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. तसेच  मतदानाच्या चार दिवस आधी सिडको भागात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत मोठा राडा झाल्यानंतर निवडणुकीत गुंडागर्दीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तीनही उमेदवारांसाठी त्यांच्या पक्षांच्या बड्या नेत्यांनी सभा घेत जोरदार आरोप- प्रत्यारोपांची बॅटिंग केली होती. त्यामुळे मतदारांनी कौल कोणत्या उमेदवाराला दिला आहे? हे येत्या २३ नोव्हेंबरला कळणार असून, आता निकालाची उत्सुकता  लागल्याचे दिसून येत आहे.

कौल कोणाला?

नाशिक पश्चिम मतदारसंघ इंदिरानगर ते थेट गंगापूर असा विस्तीर्ण पसरलेला आहे. जवळपास सात ते आठ गावे आणि जुने-नवीन सिडको वसाहतींचा मतदारसंघात समावेश होतो. सिडकोमध्ये खान्देश भागातील अहिराणी भाषिक मतदारांची संख्या जास्त असल्याने खान्देशकडून असलेल्या उमेदवाराला पसंती दिली जाते. परंतु यंदा प्रथमच दोन भागांत मतांची विभागणी झाली. सातपूरपासून गंगापूरपर्यंत मनसेचे दिनकर पाटील यांचे रेल्वे इंजिन सुसाट धावल्याची चर्चा होती. त्याचप्रमाणे सिडकोसह अंबड, चुंचाळे या कामगारबहुल पट्ट्यातदेखील पाटील यांचा करिश्मा दिसला. परंतु सिडको, इंदिरानगरमध्ये आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांचाही बोलबाला होता. माजी महापौर दशरथ पाटील यांना या मतदारसंघामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आजच्या मतदानाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.