देवळाली मतदारसंघात ५८ टक्के मतदान

कौल कोणाला, याकडे लागले लक्ष; उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 12:35:56

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : नाशिक रोड- देवळाली मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २०) ५८ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे उमेदवार असताना शिवसेना शिंदे गटानेही राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे योगेश घोलप मैदानात होते. त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळाली. दरम्यान, मतदारांनी कोणाला कौल दिला, याकडे लक्ष लागले आहे.
        आमदार सरोज आहिरे यांनी मागील निवडणुकीत परिवर्तन घडवत घोलप कुटुंबीयांकडून सत्ता खेचत नाशिक रोड- देवळाली मतदारसंघ खेचून आणला होता. त्यानंतर आमदार आहिरे पुन्हा नशीब आजमावत असून, त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांचे आव्हान होते. मात्र, महायुतीत ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाने राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिल्याने थेट युतीधर्म संकटात आणला. 
         बुधवारी (दि. २०) सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मतदान केंद्रांवर जाण्यापूर्वी बाहेर महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बूथवरून नागरिक स्लीप घेत असल्याने गर्दी दिसत होती. महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी बुधवारी निर्विघ्नपणे पार पडली.  देवळाली मतदारसंघातील देवळालीगाव, विहितगाव, चेहेडी, शिंदे, पळसे, सामनगाव, कोटमगाव, एकलहरे आदी भागांत मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसला. पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना रिक्षा, कारने मतदान केंद्रांवर आणत होते. 
       सोमवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर मंगळवारी दिवसभर व मध्यरात्रीपर्यंत छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केले जात असल्याने गोंधळ उडाला होता. महायुती, महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व अपक्ष उमेदवार व त्यांचे समर्थक मतदान केंद्रांवर उभे राहून मतदान करा, असे आवाहन करत होते. सिन्नर फाटा व विहितगाव येथे मतदान केंद्रांवर मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या. सायंकाळी मतदान संपेपर्यंत येथे उत्साह कायम होता.

ग्रामीण भागात मोठा उत्साह

नाशिक रोड- देवळाली मतदारसंघाचा ८० टक्के भाग ग्रामीण विभागात येत असल्याने तेथे मतदारांत मोठा उत्साह दिसला. सायंकाळी सहापर्यंत हा उत्साह होता. दरम्यान, ग्रामीण भागावरच देवळालीचा आमदार ठरणार असल्याने आमदार आहिरेंसह इतर उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रचार ग्रामीण भागात केल्याचे दिसले.