मालेगाव बाह्यत ६७.५४, तर मध्यत ६१.५९ टक्के
शेवटच्या तासाभरात वाढली टक्केवारी
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 12:44:13
मालेगाव : राज्यात झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी पाचपर्यंत मालेगाव बाह्य मतदारसंघात ६७.५४, तर मालेगाव मध्य मतदारसंघात ६१.५९ टक्के मतदान झाले होते. दोन्ही मतदारसंघात शेवटच्या तासाभरात मतदानाचा टक्का वाढण्याचे बोलले जात असून, दोन्ही ठिकाणच्या काही केंद्रांत मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
राज्यभरात आज बुधवारी (ता. २०) आगामी सरकार स्थापन करण्यासाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. यात ११५- मालेगाव बाह्य व ११४- मालेगाव मध्य अशा दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांमध्ये जोश दिसून आला. मालेगाव बाह्य मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीसाठी तीन लाख ८० हजार ५७६ मतदार असून, त्यात एक लाख ९८ हजार १९१ पुरुष, तर एक लाख ८२ हजार ३७६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात पहिल्या एका तासात सकाळी काही अंशी गर्दी दिसून आली, मात्र दुपारी एकनंतर मतदारांची गर्दी रोडावल्याचे पाहावयास मिळाले. यात काही मतदान केंद्रांत अधिकारी, कर्मचारी मतदात्यांची वाट पाहताना दिसून आले. दुपारी तीननंतर मात्र मतदान केंद्रांबाहेर गर्दी वाढून चारनंतर सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. या रांगा मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही काही ठिकाणी जैसे थे दिसून आल्या. त्यामुळे वेळ संपल्यानंतरही काही केंद्रातून मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी किरकोळ अपवादवगळता मतदान शांततेत सुरू होते. या मतदारसंघात सकाळच्या पहिल्या दोन तासांत फक्त ६.९४ टक्के मतदान झाल्याने मतदानाचा टक्का घसरणार, असे बोलले जात होते. मात्र हे सारे अंदाज दुपारनंतर मतदात्यांनी फोल ठरविले.
दुसरीकडे मालेगाव मध्य मतदारसंघात तीन लाख ४२ हजार ७१३ मतदार असून, यात एक लाख ७६ हजार ०३३ पुरुष, तर एक लाख ६६ हजार ६७० स्त्री मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर मतदानासाठी गर्दी दिसून आली होती. त्यामुळे पहिल्या दोन तासांत मतदानाची टक्केवारी दहाच्या घरात पोहोचली. ही टक्केवारी ९.९८ होती. त्यानंतर मात्र मतदान करण्यासाठी मतदाते मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. या रांगा दिवसभराबरोबरच मतदानाची वेळ संपल्यानंतरही कायम होत्या.
या. ना. जाधव विद्यालयात मतदान उशिरा
शहरातील मालेगाव बाह्य मतदारसंघात समावेश होणाऱ्या मोसम पूल भागातील या. ना. जाधव शाळेतील बूथ क्रमांक २९३ मध्ये सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा होत्या. दरम्यान, एका मतदान केंद्रात सकाळी मतदान यंत्रात अचानक दोष उद््भवल्याने येथील मतदान प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रात धाव घेऊन ही समस्या सोडविल्याने पुन्हा मतदान पूर्ववत सुरू झाले. या गडबडीत अर्धा ते पाऊन तास वाया गेला. हा अपवादवगळता शहरासह तालुक्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
मतदारराजा सूज्ञ आहेत
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्र्यांनी पैशांचा महापूर वाहवला होता; परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारराजा सूज्ञ आहेत. त्यांनी आधीच मनात ठरवून घेतले होते. त्यामुळे येथे माझा विजय पक्का असून, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. जय हिंद.. जय महाराष्ट्र...!
-अद्वय प्रशांत हिरे, उमेदवार, मालेगाव बाह्य मतदारसंघ