चांदवड-देवळा मतदारसंघात ७५.७० टक्के मतदान

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 12:52:29

लोकनामा प्रतिनिधी
रेडगाव खुर्द : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी पाचपर्यंत ७५.७०टक्के मतदान झाले. चांदवड व देवळा तालुक्यातील एकूण ३०६ मतदान केंद्रांवर एकूण तीन लाख आठ हजार ८०८ पैकी दोन लाख ३७ हजार १८३ मतदारांनी हक्क बजावला होता. चांदवड शहरातील एकूण १६ मतदान केंद्रांवर किरकोळ कुरबुरी वगळता मतदान शांततेत पार पडले. शहरातील केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
         बुधवारी (दि. २०) सकाळच्या सत्रात संथगतीने मतदान सुरू असल्याने शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर अत्यल्प मतदान झाले. सकाळी सात ते नऊ या वेळेत ६.४९ टक्के, सकाळी ११ पर्यंत २१.३० टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने दुपारी एकपर्यंत ३४.१९ टक्के, दुपारी ३ पर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले. दुपारी चारनंतर चांदवड शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ६५.०१ टक्के मतदान झाले.
         सायंकाळी पाचपर्यंत एक लाख ६० हजार ४३२ पुरुष, तर एक लाख ४८ हजार ३७६ महिला मतदारांनी मतदान केले होते. सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा केली होती. मतदारांना सहाय्य करण्यासाठी आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
२०१९ च्या तुलनेत मतदानात वाढ  
चांदवड-देवळा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते; परंतु यावेळी सायंकाळी पाचपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सहापर्यंत असल्याने या उर्वरित एक तासात मतदान हे ७६ टक्क्यांवर गेले आहे.