दोन लाख विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’चे काम पूर्ण
उर्वरित विद्यार्थ्यांचेही लवकरच तयार होणार
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-21 13:02:56
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : जिल्ह्यातील तीन हजार २६५ प्राथमिक, तर दोन हजार ३१८ माध्यमिक शाळांमधील १२ लाख ६३ हजार १६१ पैकी दोन लाख ३२ हजार ७१३ विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’चे काम पूर्ण झाले असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या आयडीचे काम सुरू आहे. दिवाळी सुट्या आणि विधानसभा निवडणुकीचे कामकाज यांमुळे अपार आयडीच्या कामकाजात काहीशी अडचण आली. मात्र निवडणुकीचे कामकाज संपताच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी’च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमिक रजिस्ट्री (अपार) आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आयडीमुळे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळेल. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाणार असून, ती हवी तेव्हा ऑनलाइन पाहता येईल. त्यामुळे महिनाभरात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत.
ग्राफिकल ॲनालिसिस होणार
प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटवण्यासाठी मदत आदी बाबी नियंत्रित करण्यात येणार आहेत. अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डीजी लॉकरला जोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य, परीक्षेचे निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश हे सारे त्यांना ऑनलाइन पाहता येईल. ‘अपार’ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाइन पाठवणे सुलभ होईल. ‘अपार’ आयडी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल.
डिजिटल स्वरूपात माहिती
महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षणाचे राज्य प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. दरम्यान, पालकांच्या परवानगीने विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जातील. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्यात येणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग करता येणार आहे.