लालपरी निवडणूक कामात व्यस्त
खासगी ट्रॅव्हल्स, वाहनचालकांची चांदी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-21 13:19:15
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : जिल्ह्यातील पाचशेहून अधिक बसेस निवडणूक कामासाठी गुंतलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. मतदानासाठी अनेकांचा मूळ गावी जाण्याच्या नियोजनात अनेकांना बदल करावा लागला.
मंगळवारी (दि. १९) ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या. सोमवारी (दि. १८) मुक्कामी गेलेल्या अनेक गाड्या परत येताच थेट आगारात थांबल्या. त्यानंतर मंगळवारी कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य घेऊन त्या मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या. बुधवारी (दि. २०) मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांना परत स्ट्राँग रूमपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडविण्याची जबाबदारी एसटीवर होती. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. बुधवारीही लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. बसेस कमी असल्याने प्रवाशांना अनेक तास बसस्थानकावर ताटकळत राहावे लागले. अनेकांना बस नसल्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. दुसरीकडे रेल्वेला मोठी गर्दी उसळली होती.