फुलेनगर मतदान केंद्राजवळ दोन्ही गटांचे समर्थक भिडले

नाशिक पूर्व ः पोलिसांकडून तत्काळ हस्तक्षेप

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 13:22:40

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक : पंचवटीतील पेठ रोडवरील फुलेनगर, कालिकानगरजवळील महापालिका शाळेतील मतदान केंद्रालगत महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले व महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांच्या दोन समर्थकांत वाद होऊन हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. 
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार स्लीप वाटण्यावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विनायक गायकवाड व शंकर हिरे (दोघे रा. राहुलवाडी, पंचवटी) अशी हाणामारी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी (दि. २०) झालेल्या मतदानावेळी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात वादाचे प्रसंग घडले. पेठ रोडवरील मनपा शाळा क्रमांक ९ येथे मतदान सुरळीत सुरू असताना मतदान केंद्राबाहेर उमेदवार गणेश गिते यांचे विनायक गायकवाड ऊर्फ चिंग्या व उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांचे समर्थक शंकर हिरे समोरासमोर आले. दोघे परस्परविरोधी गटासाठी मतदारचिठ्ठ्या देत असताना मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांवरील निशाणी व चिन्ह काढून टाका यावरून दोघांत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यामुळे तेथे काही वेळ गोंधळ झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेतले. शंकर हिरे भाजपच्या माजी नगरसेविका स्व. शांता हिरे यांचे पुत्र आहेत. दोघांविरोधात कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.

चार चाकींचे नुकसान
पाच दिवसांपूर्वी त्रिकोणी बंगला, हिरावाडी येथेही ॲड. ढिकले आणि गिते समर्थक एकमेकांशी भिडले होते. नेमकी त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांची नाशिकमध्ये सभा होती. त्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. प्रचार संपण्याच्या दिवशी पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना भिडले. यात दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. पाच-सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मतदानाच्या दिवशीही पुन्हा एकदा वाद झाल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेतले.