दिंडोरी मतदारसंघात विक्रमी ७८ टक्के मतदान
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 13:40:06
लोकनामा प्रतिनिधी
दिंडोरी : दिंडोरी- पेठ विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहात हक्क बजावत शांततेत मतदान पार पडले असून, ७७.७५ टक्के विक्रमी मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ, प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर, अपक्ष संतोष रेहरे यांच्यासह तेरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. यासर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंदिस्त झाले आहे.
गेल्यावेळी विधानसभेला ६९.७५ टक्के मतदान झाले होते, तर लोकसभेसाठी ७५.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात विधानसभेच्या तुलनेत आठ, तर लोकसभेच्या तुलनेत तीन टक्के मतदानात वाढ झाली. एकूण दोन लाख ६४ हजार ३६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख २९ हजार ५६० महिला, तर एक लाख ३४ हजार ८०० पुरुष मतदारांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी सातपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व उमेदवारांनी शेवटच्या मतदारापर्यंत गावोगावी फिरून मतदानाची परिस्थिती जाणून घेतली. आता कार्यकर्ते आकडेमोड करण्यात व्यस्त झाले असून, उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे.
सध्या सर्वत्र द्राक्षशेतीच्या कामांना वेग आल्यामुळे मतदारांनी कामातून वेळ काढून मतदान केले. दुपारी बारापर्यंत धीम्या गतीने मतदान सुरू होते. मात्र तीननंतर पुन्हा एकदा शेतातील शेतमजूर वाड्यावस्तीवरील नागरिकांनी व महिलांनी मोठी गर्दी करून आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले. वयोवृद्ध पुरुष व महिलांनी तसेच दिव्यांगांनीही मतदानामध्ये भाग घेऊन मतदान केले. दुपारच्या वेळेतसुद्धा भर उन्हात मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान करण्यासाठी आबालवृद्ध तसेच महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गावनिहाय मतदान (आकडे टक्क्यांत)
शिंदवड - ८३.०६, वरवंडी- ७८.६६, मडकीजांब- ७७.२७, तळेगाव दिंडोरी- ७६.८०, चाचडगाव- ८४, परमोरी- ८३, पाडे ८२, दहेगाव- ८४.१७, खेडगाव- ७२.६६, वनारवाडी- ९१, लोखंडेवाडी- ८६.२१, निळवंडी- ७९.०७, चिंचखेड- ७७.६१, सोनजांब- ८१, मोहाडी-७०, पिंपळणारे- ७०, अवनखेड- ७९, जऊळके वणी- ८४, पिंंपळगाव धूम- ७६.७६, खडक सुकेणे ८३.७६, रासेगाव- ७६.४६, आशेवाडी- ७६, रवळगाव- ८०, चिंचखेड- ७७.६१, वलखेड- ८४.२२, आंबेगण- ८२, जानोरी- ७८.८०, तळेगाव वणी- ८०.२२, ओझरखेड- ७६, मातेरेवाडी- ८४, कसबे वणी-६६.२५, कोऱ्हाटे- ७६.४९, पालखेड बंधारा- ८४.४०, जऊळके दिंडोरी-७०.७८, अवनखेड- ७९, पांडाणे- ८१, आंबे दिंडोरी- ७८, म्हेळुस्के- ८२.९४, कुर्णोली- ७६.९२, वाघाड- ८२, खतवड- ८१.४६.