अदाणी समूहाचे शेअर कोसळले ; २० टक्क्यांची घसरण

दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा अदाणींवर आरोप

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-11-21 14:22:53

मुंबई : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे.  यानंतर याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली  आहे. तसेच अदाणी समूहाच्या शेअरमध्ये जवळपास २० टक्क्यांची घसरण झाली आहे. 

गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. ज्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे.  अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण दिसली. तर अदाणी एनर्जी सोल्यूशनही लाल रंगात रंगले. अदाणी ग्रीन एनर्जी कंपनीला कंत्राट मिळविण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप ठेवला गेला. 

या कंपनीच्या शेअरमध्ये १९.१७ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. अदाणी टोटल गॅस १८.१४ टक्के, अदाणी पॉवर १७.७९ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.याशिवाय अंबुजा सिमेंट्सच्या शेअरमध्ये १४.९९ टक्के तर एसीसी शेअरमध्ये १४.५४ टक्क्यांची घसरण झाली. अदाणी यांची समूह कंपनी असलेल्या एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही १४.३७ टक्क्यांची घसरण झाली. तर अदाणी विल्मारमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली.

आज सकाळी अदाणी समूहातील तीन प्रमुख कंपन्यांचे शेअर जवळपास २० टक्क्यांनी खाली आल्यामुळे एकूणच अदाणीच्या ११ शेअरवरही परिणाम दिसून आला. अदाणी समूहाचे बाजारमूल्य २ लाख कोटींनी घटले.