अदाणींना अटक करण्याची हिंमत मोदींमध्ये नाही
राहुल गांधींचा हल्लाबोल
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-21 15:50:13
मुंबई :- अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटींची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी केला आहे. सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी अदाणी यांनी ही लाच भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणानंतर अमेरिकेत अदाणींविरोधात अटक वॉरंट निघाले आहे. मात्र मोदी सरकार अदाणींना अटक करणार नाही. मोदींमध्ये तेवढी हिंमतच नाही. कारण मोदी व भाजपा अदाणींच्या पापात सहभागी आहेत, असा कडाडून प्रहार खा. राहुल गांधी यांनी भाजपावर केला आहे.
यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदाणींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत. पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदाणींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला आहे. देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरुंगात जाऊ शकतात.
दरम्यान अदाणी यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर महाविकास आघाडी भाजपवर तुटून पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सुत्रे हाती घेतल्यानंतर अदाणींविरोधात वॉरंट काढले आहे. ही मोदी व भाजपासाठी शरमेची गोष्ट आहे. अदाणीमुळे या देशाला एक डाग लावला आहे. म्हणून, आम्ही महाराष्ट्राला अदाणीराष्ट्र बनू देणार नाही. महाराष्ट्रातील अनेक निविदा देखील गौतम अदाणींनी बळकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.