दिल्ली विधानसभेसाठी 'आप'चे उमेदवार जाहीर

काँग्रेस, भाजपमधून आलेल्यांना तिकीट

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-22 12:19:28

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. केजरीवाल यांनी भाजपमधून आलेल्या तीन व काँग्रेसमधून आलेल्या तीन नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.      

आम आदमी पार्टीने ब्रह्म सिंह तंवर, अनिल झा आणि बीबी त्यागी या भाजपमधून आलेल्या नेत्यांना, तर चौधरी जुबेर, वीर सिंह धिंगान आणि सुमेश शौकीन या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. ब्रह्म सिंह तंवर भाजपचे आमदार होते. त्यांनी ऑक्टोबरमध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. तंवर महरौली आणि छतरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते. ते तीन वेळा नगरसेवकही होते. अनिल झा किराडी येथून आमदार होते. पूर्वांचलमधील मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप सोडून आपमध्ये प्रवेश केला होता. बीबी त्यागी दोन वेळा नगरसेवक होते. पूर्व दिल्लीच्या लक्ष्मीनगर आणि शकरपूरमध्ये त्यांचा प्रभाव आहे. चौधरी जुबेर काँग्रेसच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत. ते त्यांची पत्नी शगुफ्ता चौधरी यांच्यासह आपमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसचे तीन वेळा आमदार असलेले वीर सिंह धिंगान खादी ग्रामोद्योग आणि एससी-एसटी बोर्डाचे अध्यक्ष होते. काँग्रेसचे माजी आमदार सुमेश शौकीन तीन वेळा सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.