२९ वर्षांचा संसार अन् अचानक घटस्फोट
ए. आर. रहमान- सायरा बानो चर्चेत
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-22 14:20:42
भारतीय संगीतविश्वात स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गायक, वादक, संगीतकार म्हणून छाप सोडणाऱ्या प्रतिभावान, संवेदनशील, मितभाषी कलाकार म्हणून ए. आर. रहमान यांची ओळख आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रहमान त्यांच्या घटस्फोटासाठी जास्त चर्चेत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. १०-१२ नाही, तर तब्बल २९ वर्षांच्या संसारातून विभक्त होण्याचा निर्णय रहमान व त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर जाहीर केला आणि एकच खळबळ उडाली. एक मुलगा, एक मुलगी असे चौकोनी कुटुंब असलेल्या रहमान व सायरा यांनी भावनिक तणावातून हा निर्णय घेतल्याची कबुली दिली. १९९५ मध्ये रहमान व सायरा यांचे अरेंज मॅरेज झाले होते. रहमान यांच्या आईने सायरा यांची निवड केली होती. नंतरच्या जवळपास तीन दशकांत दोघांच्या नात्यांमधील कोणत्याच कुरबुरीची चाहूल चाहत्यांना, परिवाराला तसेच सिनेविश्वाला लागली नव्हती. अचानक दोघांच्या घटस्फोटाचेच वृत्त येऊन धडकल्याने सगळेच आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दरम्यान, रहमान यांच्या दोन्ही मुलांनी आपले आई-वडील विभक्त झाल्याचे दुःख त्यांच्या सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. यापूर्वी आमिर खानने त्याचा सोळा वर्षांचा संसार मोडून किरण रावशी लग्न केले होते. किरण रावशीदेखील त्याने घटस्फोट घेतला. सैफ अली खाननेदेखील अमृता सिंगबरोबरचा अनेक वर्षांचा संसार मोडून करिना कपूरशी लग्न केले. या तिघांची एकच कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे, या तिघांचे पहिले लग्न अगदीच लहान वयात झाले होते. वय वाढले तसे त्यांचे विचार, आवडीनिवडी बदलल्या, ताळमेळ बिघडत गेला आणि तेच ठरले आहे त्यांच्या घटस्फोटाचे कारण!