हार्दिक पांड्या ठरला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू
दुसऱ्यांदा मिळाला मान
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-22 14:54:54
नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या टी-२० क्रमवारीत नंबर वन ठरला आहे. अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही पांड्याने चांगली कामगिरी केली, त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. तो आयसीसी क्रमवारीत नंबर वन टी-२० अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने दोन स्थानांनी झेप घेत हा मोठा टप्पा गाठला.
हार्दिक २४४ रेटिंग गुणांसह टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंह ऐरी दुसऱ्या स्थानावर आहे. लियाम लिव्हिंगस्टोन दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस चौथ्या, तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सहाव्या, तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा सातव्या स्थानावर आहे.
पांड्याने सन २०२४ मध्ये दुसऱ्यांदा आयसीसी पुरुषांच्या टी-२० अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. यावर्षी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३५२ धावा केल्या आहेत. याशिवाय यावर्षी १६ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनकडून नंबर-१ चा ताज पंड्याने हिसकावून घेतला आहे. दरम्यान, हार्दिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी संघात सहभागी झालेला नाही आहे.