नांदगाव मतदार संघातून सुहास कांदे विजयी
अपक्ष समीर भुजबळांचा पराभव
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-23 17:03:57
नाशिक:- नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा संवेदनशील मतदार संघ म्हणूनच पाहिला जात होता. त्यातच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी जीवे मारण्याची धमकी देत राडा केल्याने हा मतदारसंघ प्रचंड चर्चेत होता. या मतदार संघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या महत्वपूर्ण लढतीत अखेर सुहास कांदे यांनी बाजी मारली आहे. सुहास कांदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
भुजबळ आणि कांदे हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. २०१४ मध्ये पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी लढत झाली. सुहास कांदेंना 50 हजार 827 मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना 69 हजार 263 मतं मिळाली. या निवडणुकीत सुहास कांदेंचा पराभव झाला. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना 85 हजार 275 मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना 71 हजार 386 मतं मिळाली. 2019 च्या निवडणुकीत सुहास कांदेंनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता.
पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाल्याने महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळेच ही लढत रंगतदार झाली.