देशाची वाटचाल वन नेशन वन पार्टीच्या दिशेने सुरु
आम्ही लढत राहू - उद्धव ठाकरे
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-23 18:33:26
मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडी वाहून गेली आहे. या अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचा स्वीकार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत, असे महायुतीने ठरवले आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की फक्त एकच पक्ष राहील. त्यानुसार, देशाची वन नेशन वन पार्टी या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे ठाकरे यांनी पराभवानंतर पत्रकार परिषद घेत सांगितले.
हा निकाल अनाकलनीय ; पण लढत राहू
सरकारला अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही, असे आकडे आहेत. आम्ही ज्या प्रचारसभा घेतल्या, हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून, महिलांना सुरक्षितता नाहीय म्हणून दिली की नेमकी कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे कळत नाहीय. हा निकाल अनाकलनीय आहे, यामागंच गुपित शोधावं लागेल. आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका, हा ईव्हीएमचा विजय आहे, असू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य नसेलतर आम्ही प्राणपणाने लढत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही वचन देतो की आम्ही लढत राहू”, असेही ठाकरे यांनी पुढे सांगितले. लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम असेल तर बाकीच्या गोष्टी उघड उघड दिसत आहेत असे सांगून अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री होईल का? असाही प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला आहे.