टीम बुमराहने पर्थवर रचला इतिहास
कांगारुंवर २९५ धावांनी दणदणीत विजय
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-25 15:13:44
पर्थ :- न्युझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पराभव, रोहित शर्मासह विराटचा हरवलेला फॉर्म, काही खेळाडूंच्या दुखापती, ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्या अशा अनेक आव्हानांचे चक्रव्यूह भारतीय संघाने अखेर भेदून ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह, शतकवीर विराट कोहली, यशस्वी जैस्वाल हे त्रिकुट या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पर्थच्या स्टेडिमयवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे.
यशस्वी जैस्वालच्या १६१ धावा आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी ५३३ धावांचे लक्ष्य देत डाव घोषित केला होता. पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दाणादाण उडवून टाकली. विजयासाठी भारताने ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र २३८ वरच त्यांचा डाव संपुष्टात आला.
विराट कोहलीच्या ३० व्या कसोटी शतकासह भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्या. यासह भारताने ५३३ धावांची आघाडी घेत डाव घोषित केला. यानंतर भारताने तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी बोलावले आणि ३ जणांना तंबूत धाडले. चौथ्या दिवशी भारताने तिसऱ्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाला गुंडाळत ऐतिहासिक विजयाची पर्थ स्टेडियमवर नोंद केली. दुसऱ्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदरने २ विकेट्स, हर्षित राणा आणि नितीश रेड्डीने १ बळी घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर तग धरु शकली नाही. १५० धावात संघ तंबूत परतला. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी हिसका दाखवत कांगारू संघाच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. सिराज, हर्षित राणाने बुमराहला साथ देत कांगारू फलंदाजीचे कंबरडे मोडले.
पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने ५ बळी घेतले. तर पदार्पणवीर हर्षित राणाने पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स मिळवल्या. तर सिराजने २ बळी घेतले.
भारतीय संघ पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह फलंदाजी करण्यासाठी उतरला. दुसऱ्या डावात पहिल्या डावातील वचपा काढत के.एल.राहुल आणि यशस्वी जैस्वालने २०१ धावांची ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून सर्वात मोठी भागीदारी रचत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वी जैस्वालने पहिल्याच ऑस्ट्रेलिया कसोटीतील पहिल्या कसोटीत शतक झळकावत इतिहास घडवला. यशस्वीने १६१ धावांची तर राहुल ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी कायमचं कर्दनकाळ ठरलेल्या विराट कोहलीने आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवत १४३ चेंडूत वादळी शतक झळकावले.