देवेंद्र फडणवीस आता तरी डॉ.आहेरांना मंत्रीपद देणार का?

चांदवडकरांनी डॉ. आहेरांना तिसऱ्यांदा केले आमदार

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-25 16:01:23

 लोकनामा प्रतिनिधी
रेडगाव खुर्द : चांदवड-देवळा मतदारसंघात प्रचारादरम्यान चांदवड येथे डॉ. राहुल आहेर यांच्यासाठी १५ नोव्हेंबरला झालेल्या जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला शब्द दिला होता की, तुम्ही डॉ. राहुल आहेर यांना आमदार करा, आमचे सरकार आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात मी त्यांना मंत्री करतो. चांदवड- देवळ्यास प्रथमच मंत्रिपद मिळतेय म्हणून येथील मतदारांनी डॉ. राहुल आहेर यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. आता फडणवीस मंत्रिपदाचा शब्द पूर्ण करतात, की २०१९ ची पुनरावृत्ती होते? याची उत्सुकता मतदारसंघातील जनतेला लागली आहे.
       सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळीही तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असाच शब्द दिला होता, की तुम्ही राहुल आहेरांना आमदार करा, मी तुम्हाला मंत्री देतो. तेव्हाही येथील मतदारांनी विश्वास ठेवत राहुल आहेरांना दुसऱ्यांदा निवडून दिले होते. परंतु त्यावेळी फडणवीस यांचे सरकार आले नाही. जेव्हा आले, तेव्हा मंत्रिमंडळात डॉ. राहुल आहेरांना स्थान मिळाले नाही. परंतु आता राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आले आहे. आणि चांदवड- देवळाकरांनी राहुल आहेरांना फडणवीस यांच्या शब्दाखातर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे.
तसेच आत्ताच्या सभेत फडणवीस यांनी राहुल आहेरांना २० हजारांच्या पुढे लीड दिला, तर कॅबिनेट मंत्री आणि त्याच्या आत लीड असेल, तर राज्यमंत्री करतो, असे घोषित केले होते. मात्र चांदवड- देवळा तालुक्यांनी राहुल आहेरांना तब्बल ४९ हजारांचा लीड दिल्याने फडणवीस आता कॅबिनेट मंत्रिपदाचा त्यांनी दिलेला शब्द पाळतात की, यावेळी ही देवळा, चांदवडच्या जनतेची फसवणूक करतात? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांदवड तालुक्याला आजवर मंत्रिपद लाभलेले नाही.
          मतदारसंघाला मंत्रिपद मिळाल्यास कायापालट होऊ शकतो. सिंचन, औद्योगीकरण, कृषी क्षेत्र, शिक्षण, प्रक्रिया उद्योग यांमध्ये हा मतदारसंघ बराच मागे आहे. चांदवड- देवळा हा पूर्णपणे ग्रामीण बाज असलेला तसेच कृषिकेंद्रित कांदा आणि द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असल्याने या बाबी हेरून राहुल आहेर यांना कृषिमंत्री, ग्रामविकासमंत्री, सिंचन यांपैकी एखादे महत्त्वाचे खाते मिळाल्यास मतदारसंघाबरोबर उत्तर महाराष्ट्रासाठीही लाभदायी असेल. राहुल आहेर हे वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने त्यांना आरोग्य खाते देऊ नये, अशीच येथील जनतेची जनभावना आहे. फडवणीस यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला खरा, परंतु महायुतीचे यावेळी २४०च्या आसपास आमदार निवडून आल्याने मंत्रिपद वाटपात मोठी कसरत करावी लागणार 
आहे. 

अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत 

जिल्ह्यातील विचार करता भाजपच्या कोट्यातून राहुल आहेरांबरोबरच महिला कोट्यातून देवयानी फरांदे, सीमा हिरे,आदिवासी कोट्यातून नरहरी झिरवाळ, दिलीप बोरसे, तर शिंदे गटाकडून दादा भुसे, अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर हेही स्पर्धेत आहेत. भुजबळ आणि दादा भुसे विद्यमान मंत्री असल्याने त्यांची पुन्हा निश्चिती आहेच. त्यामुळे एका जिल्ह्यात किती मंत्री द्यायचे तसेच मंत्रिपदाची रांग मोठी असल्याने महायुतीच्या नेत्यांचा मोठा कस लागणार आहे. एक मात्र खरे की, भुजबळ आणि भुसे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे असल्याने भाजपला आपली पकड मजबूत करण्यासाठी एखादे का होईना मंत्रिपद जिल्ह्याला द्यावेच लागेल, हे निश्चित. परंतु ते कोणाला मिळते? यापेक्षा फडवणीस यांना चांदवड- देवळ्याच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करावा लागेल, अन्यथा दुसऱ्यांदाही फसवणूक झाल्यास फडवणीस यांना येथील जनता माफ करणार नाही हे नक्की.