अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे
नरहरी झिरवाळांनी व्यक्त केली इच्छा
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-25 18:54:28
मुंबई: महायुतीने राज्यात महाविकास आघाडीचे नामोनिशाण मिटवत एकहाती सत्ता मिळवली आहे. लवकरच महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? ही चर्चा निकालानंतर रंगली आहे. कारण मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून अजित पवारांनी फडणवीसांशी हात मिळवणी केली होती. तर तिकडे लाडकी बहीण योजना हिट झाल्यामुळे एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी उत्सुक आहेतच. तर या निवडणूकीचे अनभिषक्त सम्राट देवेंद्र फडणवीस तर ही संधी आता दवडणार नाही, कारण प्रचंड मताधिक्क्याने भाजपाने विजय मिळवलेला असल्याने ते दिमाखात, ऐटीत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी नक्कीच तयार असणार, कारण गेल्या वेळेस त्यांना कटकारस्थान करुन मुख्यमंत्रीपद मिळवल्याचा ठपका स्वत:च्या नावावर नको होता, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना ते पद देऊन टाकले. मी कसा स्वच्छ प्रतिमेचा आहे, हे त्यांना यातून दाखवायचे होते. पण आता जर त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले तर याचा थेट लाभ एकनाथ शिंदे, अजित पवारांना होईल. इतक्या शानदार रितीने आपण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत स्थानापन्न होत असल्याचा वेगळाच आनंद त्यांना मिळणार आहे. त्यामुळे फडणवीसांनी त्यांची चाल चाललेली आहे. आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.
याच दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगून पुन्हा ट्विस्ट आणला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? असे विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे तीनही सक्षम नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही झाले तरीदेखील आम्हाला चालणार आहे. अजितदादा ११ वेळी अर्थमंत्री राहिले आहेत. दोन-चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत. त्यामुळे आमची इच्छा आहे की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. राज्याने अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहावे, अशी सर्वसामान्य जनतेची देखील इच्छा आहे. मात्र महायुतीतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्या निर्णयाचे आमची स्वागत करू, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.
पाच वर्ष मी विधान भवनात काढले. आता रस्त्याच्या अडून पलीकडे गेलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलावून दाखवली. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला आतापर्यंत न मागताच सगळं मिळालं आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास न मागण्यावर सुद्धा आहे. मला न मागता काही न काही मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.