फडणवीस पुन्हा येणार?

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-11-26 11:49:13

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक लागून महायुती विशेषकरून भाजपने या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील राजकीय चाणक्य म्हणून संबोधले जाणारे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसोबत मित्र पक्षांनाही घवघवीत यश मिळवून दिले आहे. त्यामुळे आजच्या घडीला ते मुख्यमंत्रिपदाचे सर्वांत मोठे दावेदार असताना, अद्याप त्यांच्या ताजपोशीची घोषणा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करत आहे. महायुतीच्या यशाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असले, तरी त्यांच्या नावावर केंद्रीय नेत्यांकडून अद्याप एकमत होताना दिसत नाही. त्यातच कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, याचा निर्णय आता भाजपचे शीर्ष नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याऐवजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह घेणार असल्याचे समजते. त्यामुळे  फडणवीस यांची अवस्था ‘हेचि फळ काय मम तपाला?’ अशी झाली आहे. मात्र, राज्यात सन २०१९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपला आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आलेली दिसते. विधानसभा निवडणुकीत भाजप सलग तिसऱ्यांदा सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत सर्वांत जास्त १०५ जागा जिंकणाऱ्या भाजपला अर्धी टर्म विरोधी पक्षात बसायला लागले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी नावाच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपला महाराष्ट्रातील जनतेनेदेखील मतांचे भरभरून दान दिले व मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. त्यानंतर आलेल्या २०१९ च्या निवडणुकीत फडणवीस यांचा आत्मविश्वास पराकोटीला गेला व त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा दिली. मात्र, याचा विपरीत परिणाम झाला. फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात बसावे लागले. १०५ आमदार निवडून येऊनही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगितल्याने अखेर अनेक वर्षांची राज्यातील युती संपुष्टात आली. या सर्व प्रकाराला त्यावेळी फडणवीस यांनाच जबाबदार धरण्यात आले. राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे शिल्पकार दिवंगत नेते प्रमोद महाजन आज असते तर ही युती तुटलीच नसती. त्यांनी या प्रश्नावर योग्य तोडगा काढला असता, इथपर्यंत चर्चा रंगल्या. भाजप-शिवसेना युती तुटण्यास फडणवीस यांचे राजकारण कारणीभूत असल्याचे त्यावेळी बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांना सोबत घेऊन फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घडवून आणला. औटघटकेच्या या सरकारमुळे भाजपचे देशभर हसू झाले. ज्या पक्षाविरोधात निवडणूक लढवली गेली त्यांना सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या फडणवीस यांच्या प्रयत्नांची भाजपमधून खिल्ली उडवत नाराजी दर्शविण्यात आली. अर्थात, या सर्व गोष्टींना केंद्रातून पाठिंबा असल्याशिवाय फडणवीस हे धारिष्ट्य करणार नाही. यशाचे सगळे भागीदार असतात मात्र, अपयश एकट्याला पचवावे लागते, अशी अवस्था फडणवीस यांची झाली. त्यामुळेच आपली चूक सुधारत फडणवीस यांनी शिवसेनेतच दुफळी माजवत अखेर सत्ता हस्तगत केली. त्यावेळीही फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' हे स्वप्न पूर्ण झाले नाही. महाराष्ट्रातील शिवसेनेतील ही दुफळी मराठी जनतेला खटकली व त्याचा फटका सर्वस्वी भाजपला बसणार व पुन्हा एकदा राज्यात शिवसेनेची लाट येणार, अशीच काहीशी स्थिती होती. त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांना त्यावेळी नाइलाजाने उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची संभाळावी लागली. त्यानंतर त्यांनी राज्यात जो काही सत्तेचा सारीपाट मांडला त्याचे अपेक्षित फळ लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळाले. फडणवीस यांना आता राज्यातील राजकारणातून हकलेले जाणार इथपर्यंत या चर्चा गेल्या. मात्र, हार मानतील ते देवेंद्र कसले? विधानसभा निवडणुकीत याच देवेंद्र यांनी पुन्हा जबरदस्त मुसंडी मारत राज्यात भाजपची एकहाती सत्ता आणली. मात्र, त्याचे अपेक्षित फळ अद्याप त्यांना मिळालेले नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असले, तरी २०१९ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप यावेळी त्यांची ताजपोशी करण्याची घाई करत नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहजासहजी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीत. निवडणुकीत फडणवीस यांनी आपल्याला आता मुख्यमंत्रिपदात रस नसल्याचे सांगून पुढील मुख्यमंत्री पुन्हा शिंदेच राहतील, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. आता हेच शिवसेनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे यांचीच निवड करा, अशी मागणी करू लागले आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे निदान पुढील काही वर्षं का होईना त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करावे, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटले जाऊ शकते. हाच फॉर्म्युला २०१९ च्या निवडणुकीतदेखील मांडला होता. पण पहिला मुख्यमंत्री आमचाच होईल यावर शिवसेना अडून बसली होती. आताही तीच परिस्थिती आहे. पक्ष तोच आहे. फक्त नेता बदलला आहे. या सर्व राजकारणात मुख्यमंत्री शिंदे यांना दुखावून चालणार नाही. शिंदे यांनी स्वपक्षाशी बंडखोरी करत ४० आमदारांना घेऊन मुख्यमंत्रिपद मिळवले होते. यावेळी तर त्यांचे त्याहून अधिक आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांचा मुख्यमंत्रिपदावर अधिकार आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले नाही तर ‘गरज सरो अन्‌ वैद्य मरो’ अशी त्यांची स्थिती होईल. भाजपने त्याचवेळी त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले असते तर आज फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार राहिले असते. आता मुख्यमंत्री पदाची ही खुर्ची शिंदे यांच्या हातून सहजासहजी हिसकावून घेणे आजतरी भाजपला शक्य वाटत नसावे. त्यामुळे बहुतेक पुढील अडीच वर्षे फडणवीस यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आले तर आश्चर्य वाटायला नको! या सर्व प्रकरणात देवेंद्र यांचा ‘फडणवीस’ झाला आहे. त्यांचेच राजकारण त्यांच्या अंगलट आले आहे.