माजी नगरसेवकावर मालेगावात गोळीबार

हल्ल्यातून नदीम बाल बाल बचावले

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-11-26 12:47:46

लोकनामा प्रतिनिधी
मालेगाव : येथील बडी हायस्कूल भागातील बाग- ए- मेहमूद येथे माजी नगरसेवक नदीमउद्दीन अलीउद्दीन शेख ऊर्फ नदीम फिटर यांच्यावर त्यांच्या घरासमोर दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. 
      नदीम फिटर रविवारी (दि. २४) मध्यरात्री बाराच्या सुमारास बाग- ए- मेहमूद भागात आपल्या घरासमोर एकाशी रस्त्यावर बोलत उभे होते. ते घरात जात असतांना तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर दोघे तेथे आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने नदीम यांच्या दिशेने एकापाठोपाठ एक अशा दोन वेळा गोळ्या झाडल्या. मात्र, या हल्ल्यातून नदीम बाल बाल बचावले. याप्रकरणी नदीम यांनी आझादनगर पोलिसांत तक्रार दिली असून, उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत. 

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस   अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक अधीक्षक तेगबीर सिंग संधू सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? याचा पोलीस शोध घेत आहेत.  दरम्यान, हा जीवघेणा हल्ला नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून केल्याची चर्चा रंगली आहे. नदीम फिटर यांनी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार एमआयएमचे मौलाना मुफ्ती यांचे काम केल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, नदीम फिटर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचेही बोलले जाते. त्यातच त्यांनी येथील महानगरपालिकेतील दोघांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून पकडून दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने व कोणी केला, याचा पोलीस शोध घेत आहेत.