भाजपसोबत जाणे ही खूप मोठी चूक झाली

उमेदवारांकडून स्पष्ट नाराजी व्यक्त

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-26 12:52:09

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२५ विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही पराभव झाला. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २५) मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली होती. यात मनसेच्या उमेदवारांनी भाजपसोबत जाण्याबाबत उघडपणे नाराजी जाहीर केली. 

बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत मते जाणून घेतली. यासोबतच भाजपसोबत जाणे ही चूक झाली, अशी स्पष्ट नाराजी उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली. मनसेची या निवडणुकीत अतिशय सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. शिवाय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी  मतांची टक्केवारीदेखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते.