होय, मला ट्रम्पेटचा लाभ झाला: वळसे-पाटील
शरद पवारांची भेट घेत सूचक वक्तव्य
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-26 13:02:35
मुंबई : विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट (तुतारी) चिन्हाचा मला लाभ झाल्याची प्रांजळ कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने वळसे पाटील यांनी सोमवारी (दि. २५) शरद पवारांसोबत बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी अतिशय उपयुक्त अशी चर्चा झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पवार- पवार एकत्र येण्याबाबतही सूचक वक्तव्य केले.
मंत्री वळसे पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सोमवारी (दि. २५) पुण्यतिथी असल्याने वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी वळसे पाटील व शरद पवार एकत्र आले होते. त्यावेळी वळसे पाटील यांनी सध्याच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांच्याशी थोडक्यात चर्चा केली. यंदाची निवडणूक ही वेगळ्या प्रकारची निवडणूक झाल्याचे पवार यांनी म्हणाले.
वळसे पाटील म्हणाले, की मुंबईतील वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने मी बैठकीला उपस्थित होतो. यात शरद पवारांचे मी आशीर्वाद घेतले. मी विसरलो की, ते काय बोलले, पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. केवळ यंदाची निवडणूक वेगळी असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरील डमी उमेदवारामुळे तुमचा विजय झाला का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, होय लाभ झाल्याचे सांगत त्यांनी प्रांजळ कबुली दिली. हे खरे आहे की, मला ट्रम्पेटचा लाभ झाला. माझ्या येथे ट्रम्पेटने मते घेतली. पण इतर भागात तसा परिणाम झाला का, ते मला माहिती नाही, असेही पाटील म्हणाले. पवार आणि पवार एकत्र येतील का, या प्रश्नावरही वळसे पाटलांनी सूचक वक्तव्य केले. त्याला अजून वेळ आहे. कारण आधी मुख्यमंत्री ठरेल, मंत्रिमंडळ ठरेल, मग अधिवेशन होईल आणि त्यानंतर होईल कोणता पक्ष कुठे येतोय वगैरे असे म्हणत पवार-पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याच्या प्रश्नाबाबत मला माहिती नाही. कोण कुणाच्या संपर्कात आहेत, कोण नाही, याची मला माहिती नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.