इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन
देशभरातून पक्ष समर्थकांचे शक्तिप्रदर्शन
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-26 13:24:34
कराची : तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांकडून निदर्शने केली जात आहेत. तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या आवाहनानंतर देशभरातून पक्ष समर्थकांचे ताफे शक्तिप्रदर्शन करत राजधानी इस्लामाबादकडे कूच करत आहेत. सरकारकडून मात्र पीटीआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. याबरोबरच त्यांना इस्लामाबादकडे येण्यापासून रोखण्याकरिता अश्रुधूर, तसेच बळाचा वापर करण्यात येत आहे.
इस्लामाबादकडे निघालेल्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारी यंत्रणांच्या जोरदार विरोधाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर, विरोधी पक्षनेते उमर अयुब यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय समर्थकांचा ताफा पंजाबमार्गे स्वाबीहून इस्लामाबादला जात होता. या ताफ्यातील पीटीआय समर्थकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. अट्टोक ब्रिज, चाच इंटरचेंज व गाझी बरोथा कॅनॉल या भागात हा प्रकार घडला. स्वाब येथून निघालेल्या पीटीआय समर्थकांच्या ताफ्याचा प्रवास ते पंजाब प्रांतात प्रवेश करेपर्यंत सुरळीत सुरू होता. मात्र, पुढे त्यांना सरकारी यंत्रणांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यावेळी गंडापूर यांनी पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले. जोपर्यंत पीटीआयचे नेते इम्रान खान यांची सुटका होत नाही, तोपर्यंत आपला मोर्चा माघारी फिरवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. गाझी येथेही त्यांनी समर्थकांना संबोधित करताना पुढील प्रतिकारासाठी तयार राहावे, असे आवाहन केले. पीटीआय समर्थकांचा ताफा गाझी पुलावर काही काळासाठी थांबवण्यात आला होता. यावेळी काही प्रमाणात पीटीआय पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याचे पाहायला मिळाले