शहरात सीमा हिरे यांचे ‘भावी मंत्री’ बॅनर
मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-26 13:56:57
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी सलग तिसऱ्यांदा आमदारकीची गळ्यात माळ टाकत हॅट्ट्रिक केल्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय मितभाषी, जाणकार आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेल्या सीमा हिरे यांची भावी मंत्रीपदावर नियुक्ती व्हावी, असे मतदारसंघातील नागरिकांना वाटत आहे. यापार्श्वभूमीवर आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांकडून ‘नाशिक पश्चिम मतदारसंघातील भावी मंत्री’ असा उल्लेख असलेले शेकडो बॅनर्स लावण्यात आले आहेत.
नाशिक पश्चिम विद्यानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे यांचे सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पाथर्डी गाव, उत्तमनगर, इंदिरानगर, सातपूर , खुटवडनगर, माउली लॉन्स परिसर यांसह विविध भागांत मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत हिरेच्या समर्थकांकडून सलग तीन वेळा आमदार म्हणून हॅट्ट्रिक केल्याबद्दल शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. फलक लावून समर्थकांनी संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच सीमा हिरे यांना ‘भावी मंत्री’ म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सीमा हिरे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
आमदार सीमा हिरे यांनी गेल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत बंद पडलेले छोटे-मोठे औद्योगिक प्रकल्प सुरू करून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर, अंबडसह सातपूर औद्योगिक वसाहतीतील विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी मतदारसंघातील सर्वांनीच सीमा हिरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली म्हणजे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील.