भाजप, शिवसेना शिंदे गटात इनकमिंग वाढणार

माजी नगरसेवकांमध्ये धाकधूक

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-26 14:03:54

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक: विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाले असून, लवकरच आता महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक माजी नगरसेवकांत चलबिचल वाढली आहे. महायुतीकडून लढल्यास यश मिळण्याची शाश्वती असल्याने भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात येत्या काळात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
           सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळाला होत‍ा. तोच ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, अशी चिन्हे होती. पण त्याउलट महायुतीने एकहाती मैदान मारत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. त्यामुळे हाच टेम्पो कायम ठेवत पुढील दोन-तीन महिन्यांत राज्यात मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा बार उडवला जाऊ शकतो.
          अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार करत भाजप व शिवसेना शिंदे गट सत्तेत आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सत्तेत दाखल झाले. पक्ष फोडाफाडीचा राग लोकसभेत पाहायला मिळाला. त्यामुळे महायुतीने महापालिका निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली नाही. परंतु आता विधानसभेत सर्व मुद्दे निकाली काढत जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. त्यामुळे त्यांचे हौसले बुलंद असून, महापालिका निवडणुकांतही हाच ट्रेंड कायम राहण्याची चिन्हे आहेत.  ते पाहता शहरातील महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांत चलबिचल वाढली आहे. महायुतीची हवा असल्याने काही नगरसेवक तिकडे उडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात शिवसेना ठाकरे गट, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला भगदाड पडू शकते.

शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासमोर आव्हान
एकनाथ शिंदे यांच्या बंडात शिवसेना ठाकरे गटाच्या ३५ पैकी १३ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. विधानसभेच्या अपयशानंतर पक्षाला आणखी धक्के बसू शकतात. त्यामुळे उर्वरित नगरसेवकांची मोट बांधून ठेवण्याचे आव्हान ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांसमोर असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासमोर नगरसेवकांना टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल.