जमिनीच्या वादातून दाेघांंची हत्या झाल्याचे उघड

साल्हेर किल्ल्यावर आढळले होते मृतदेह

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-11-26 14:16:23

लोकनामा प्रतिनिधी
साल्हेर : जायखेडा पोलीस ठाण्यांतर्गत साल्हेर किल्ल्याच्या पठारावर शुक्रवारी (दि. २२) दोन पुरुषांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले होते. या दोघांचा खून नातलगांसह त्यांच्या मित्रांनी जमिनीच्या वादातून  केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी सटाणा, देवळा व कळवण तालुक्यांतील सहा जणांना अटक केली आहे.  
          यातील मृत दोघांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर शस्त्रांचे वार केल्याचे आढळून आले. मृतदेहांच्या अंगातील कपडे व इतर चीजवस्तूंवरून पोलिसांनी मृतांची ओळख पटवली. त्यात रामभाऊ गोटीराम वाघ (६०, रा. गोपाळखडी, ता. कळवण) व नरेश रंगनाथ पवार (६३, रा. ता. कळवण) अशी खून झालेल्या दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, जायखेडा पोलिसांत  मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
          पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगावचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकांनी तपास करून रामभाऊ वाघ व नरेश पवार हे दोघेही १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद अभोणा पोलीस ठाण्यात होती हे पडताळले. दोघेही दुचाकीवरून सटाण्याच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पथकाने सखोल चौकशी करून साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात सापळा रचून सहा संशयितांची धरपकड केली. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार गिरीश निकुंभ, शरद मोगल, सुधाकर बागूल, प्रशांत पाटील, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने या दुहेरी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. 

हे आहेत संशयित

विश्वास दामू देशमुख (३६, रा. केळझर, ता. सटाणा), तानाजी आनंदा पवार (३६, रा. खालप, ता. देवळा), शरद ऊर्फ बारकू दगाजी गांगुर्डे (३०, रा. बगडू, ता. कळवण), सोमनाथ मोतीराम वाघ (५०), गोपीनाथ साेमनाथ वाघ (२८, दोघे रा. गोपाळखडी, ता. कळवण) व अशोक महादू भोये (३५, रा. सावरपाडा, ता. कळवण)