‘एक है तो सेफ है’
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-11-27 11:52:01
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेप्रमाणेच भाजपने दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण घडून आले. मात्र, या दमदार विजयानंतर महायुतीला एकत्रित राहण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात पुन्हा २०१९ च्या सत्तांतराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्यात सर्वांत जास्त जागा मिळवूनही मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्याची घाई टाळण्यात आली. राज्यातील कामगिरी पाहता मुख्यमंत्रिपदाची माळ फडणवीस यांच्याच गळ्यात पडणार हे सांगायला राजकीय भविष्यवेत्त्यांचीदेखील गरज नाही. मात्र, मागील अनुभव पाहता आपलाच डाव आपल्यावर उलटू नये, याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. विधानसभेची मुदत संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा दिला असून, त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत शिंदे यांच्याकडून हा कार्यभारदेखील काढण्यात येऊन त्यांच्या नावापुढे उपमुख्यमंत्रिपदाची पाटी लागू शकते. मात्र, हे सर्व करताना एकनाथ शिंदे नाराज होणार नाहीत याची काळजी भाजपला वाहावी लागणार आहे. राज्यातील मंगळवारचे वातावरण पाहिले तर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची जवळपास नियुक्ती झाल्यात जमा आहे. फडणवीस यांची आज भाजपच्या गटनेतेपदी निवड होऊन मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मोबदल्यात एकनाथ शिंदे यांना राज्यातील सत्तेत अधिकचा वाटा दिला जाईल. केद्रात मंत्रिपद दिले जाईल. म्हणजेच महत्त्वाची जास्तीची खाती देऊन एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसैनिकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाईल. शिंदे यांनादेखील आपल्याला आता मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल याची खात्री वाटू लागली होती. मुख्यमंत्रिपदाचा रीतसर राजीनामा देण्याअगोदर त्यांनी शिवसैनिकांना वर्षा निवासस्थानी गर्दी न करण्याचे व एकत्रित न येण्याचे आवाहन केले आहे. शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी पुनश्च निवड व्हावी, यासाठी दबावतंत्र निर्माण करण्याचा शिंदे व शिवसैनिकांकडून प्रयत्न सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील प्रमुख शिवसैनिकांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे अनेक शिवसैनिकांनी मुंबईच्या दिशेने कूच केले होते. ‘माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये,’ असे आवाहन आता शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण देत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे सांगितले आहे. एकप्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून आता एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे माघार घेतल्याचे सध्यातरी चित्र आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांचीदेखील देहबोली बदलली आहे. मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्याशी नजरानजर टाळण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. कार्यक्रमादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काहीसा दुरावा जाणवला. विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर महायुतीचे तिन्ही नेते एकत्र दिसले. त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी या नेत्यांमध्ये सब कुछ आलबेल दिसत होते. मात्र, महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरून गेल्या तीन दिवसांत बराच खल सुरू होता. एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणात दबावतंत्र निर्माण केले होते. मात्र, भाजपने हे दबावतंत्र सामाेपचाराने झुगारून लावले आहे. राज्यात आता मुख्यमंत्रिपदावरून सकारात्मक वातावरण निर्माण केले जात असले, तरी ही सकात्मकता या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून दिसून येत नाही. इतके दिवस एकमेकांना उत्स्फूर्तपणे अभिवादन करणारे हात आता गर्भगळीत झाल्यासारखे वाटत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी भावी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधून माघार घेतली असली, तरी त्यांचा हा निर्णय शिवसैनिकांच्या पचनी उतरवणे त्यांना अवघड वाटत आहे. त्यामुळेच की काय, कोणताही दगाफटका नको म्हणून उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदे यांनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली असावीत. पक्षात मुख्य नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असून, या निर्णयाशी सर्व आमदार बांधील असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटींबरोबर पक्षशिस्तीचे पालन केले जाईल, असा आशय या प्रतिज्ञापत्रात असल्याचे समजते. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच शिंदे यांचा हा खटाटोप दिसतो. कारण शिवसेना बंडाच्या केंद्रस्थानी स्वत: एकनाथ शिंदे होते. बंडाच्या वेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची संख्यादेखील वाढून आता ५७ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू असताना अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या वाट्याला पुन्हा उपमुख्यमंत्रिपद येणार हे खरे असले, तरी मुख्यमंत्रिपदाची ते सुरुवातीपासून स्वप्न पाहत आहेत. त्यांचे काका शरद पवार यांनी त्यांच्या या स्वप्नांना पुन्हा खतपाणी घातले तर तेदेखील पुन्हा वेगळी वाट धरू शकतात. राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या सरकारची सध्याची अवस्था तरी तीन तिघाडा अन् काम बिघाडा अशी झाली आहे. आता जनतेच्या कौलाचा अनादर करण्यापेक्षा या तिन्ही पक्षांनी एक खुणगाठ मनाशी पक्की बांधली पाहिजे अन् ती म्हणजे ‘एक है तो सेफ है.’