देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री
शिंदे, पवार उपमुख्यमंत्री; सत्तेत शिंदेंना मिळणार अधिकचा वाटा
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-27 12:36:45
मुंबई : दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील. येत्या दोन दिवसांत याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे समजते. नाराज शिंदे यांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने सव्वादोनशेचा आकडा पार केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले. लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी शिवसेनेचे आमदार आक्रमक होते. दुसरीकडे, एकट्या भाजपने १३२ जागांवर विजय मिळविल्यामुळे फडणवीसांना पुन्हा संधी मिळावी यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील होते. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यांतर मुख्यमंत्रिपद भाजपकडेच जाणारस हे जवळपास निश्चित होते. त्यानंतर शिंदे यांनीही जोरदार प्रयत्न केले. पण आता फडणवीसांच्या नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याने शिंदे नाराज होण्याची शक्यता आहे. शिंदेंची ही नाराजी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जात आहे.
मुख्यमंत्रिपद भाजपला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाईल. राज्यातही महत्त्वाची खाती शिंदेंकडे देण्यात येणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर लढल्याने भाजपला एवढे मोठे यश मिळाल्याचे मत दिल्लीतील भाजप नेत्यांचे आहे. फडणवीसांनी केलेल्या कामाचा फायदा भाजपला झाला असून, त्यामुळेच एकट्या भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे मंगळवारी (दि. २६) राजीनामा सुपूर्द केला.
राजीनामा देण्याआधी शिंदे कार्यकर्त्यांना म्हणाले की, महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये.
जनतेची दिशाभूल करू नका: बावनकुळे
विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यातील जनतेची दिशाभूल करू नका. तिन्ही पक्षप्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंची अवस्था शोले चित्रपटाच्या असरानीसारखी झाली आहे. अर्धा इकडे जातो, अर्धा तिकडे जातो. त्यांचे आमदारही ठाकरेंचे ऐकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे मंगळवारी (दि. २६) राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी तो स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.
कार्यक्रमात नजरानजर टाळली?
मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र, या कार्यक्रमादरम्यान या दोन्ही नेत्यांत काहीसा दुरावा असल्याचे दिसले. या कार्यक्रमातील दृश्य पाहून हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत असल्याचे बोलले जात आहे. त्यांची देहबोली पाहून असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्रिपद हे यामागचे मुख्य कारण आहे.