मतदान झाले ३१२; मतमोजणीत निघाले ६२४

जितेंद्र आव्हाडांनी दिली आकडेवारी

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-27 13:05:31

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पराभवानंतर शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपावर भाष्य करण्यास नकार  दिला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार सातत्याने ईव्हीएमबाबत विविध माहिती पुढे आणत आहेत.  आव्हाड यांनी नुकतेच ते मोठ्या मताधिक्क्याने कसे निवडून आले, याबाबत माहिती दिली होती. ईव्हीएममध्ये गडबड होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची टीम कामाला लावली होती. आता त्यांनी राज्यातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत माहिती दिली आहे.
            मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत. गावात ३१२ जणांनी मतदान केले होते. मात्र, उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. ३१२ जणांनी मतदान केले असताना शिवसेना उद्धव ठाकरे गट- १९४, शिवसेना शिंदे गट- ३२६, अपक्ष हर्षवर्धन जाधव- १०४ असे मतदान झाले आहे. या  तिन्ही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ होते. या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!, अशी पोस्ट आव्हाड यांनी केली आहे. याबरोबरच त्यांनी काही बातम्या शेअर केल्या आहेत. 'द वायर'ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात पाच लाख चार हजार ३१३ अधिकचे मतदान दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात झालेले मतदान व मतमोजणीतील मतदान यात तफावत असल्याचे यात म्हटले गेले. आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला यावर स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक जिल्ह्यात सारखीच मते कशी?

दुसरीकडे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली आहे. गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने ही आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो. निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं, काय खोटे हे सांगायला तयार नाही. या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.