येवल्यात १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दोन पक्षांचे उमेदवार, तर नऊ अपक्षांचा समावेश

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-28 14:57:10

लक्ष्मण घुगे :  लोकनामा 
राजापूर : निवडणुकीच्या रिंगणात कोणीही उमेदवार उभा राहू शकत असला, तरी त्यालाही काही नियम आहेत. विशिष्ट मते न मिळाल्यास उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम जप्त होते. येथे रिंगणात असलेल्या १३ पैकी ११ उमेदवारांवर ही नामुष्की ओढावली आहे.
         लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर अनेक जण अपक्ष अर्ज भरतात व निवडणूक लढवतात. अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह काही हौस म्हणूनदेखील निवडणूक रिंगणात उतरतात. उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण गटातील उमेदवारांना दहा हजार रुपये, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा करावी लागते. त्यानुसार येथील रिंगणातील सर्वच १३ उमेदवारांनी अनामत रक्कम भरली आहे.
        निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ (१६.६%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. डिपॉझिट परत करताना एकूण वैध मतांची गणना करताना 'नोटा'ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत. येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यात सरळ सामना होता. तरीही इतर ११ जणांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन प्रचारही केला.  
        निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, सहाय्यक अधिकारी आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निरीक्षक राहुल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्यापासूनच भुजबळ- शिंदे यांच्यात चुरस दिसली. या दोघांनी एक लाख मतांचा टप्पा पार केला आहे. त्याचवेळी इतर उमेदवार मात्र तिहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. एकूण वैध मतांच्या १/६ म्हणजेच ४१ हजार ८०० मते अनामत रक्कम वाचविण्यासाठी उमेदवारांना मिळायला हवी होती. मात्र, दोघे वगळता सर्व उमेदवारांना हजाराच्या आत मते मिळाली आहेत. परिणामी या सर्वांवर अनामत जप्त होण्याची वेळ मतदारांनी आणली आहे. तिसऱ्या क्रमांकाची मते अपक्ष नरसिंह दरेकर यांना मिळाली आहेत. मात्र, तुतारी या चिन्हाशी मिळतेजुळते असलेले पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह त्यांना मिळाल्याने त्यांनी २०३५ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. मात्र, या सर्व ११ जणांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.

‘नोटा’ चौथ्या स्थानावर

दोन उमेदवार लाखाच्या पुढे, तर पिपाणी चिन्हवाला तिसरा उमेदवार ठरला. चौथा क्रमांक मात्र एकाही उमेदवाराला मिळवता आला नसून, तो मान ‘नोटा’ला मिळाला आहे. १,४२९ मते ‘नोटा’ला मिळाली आहेत. ही मते चुकून गेली की दिली गेली, हा मात्र प्रश्नच आहे.