अडीच घरांचा राजा
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-11-29 12:05:46
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार, हे आता निश्चित झाले आहे. शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एक पाऊल मागे घेतल्याने महायुतीतील वादावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा केवळ अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. एकप्रकारे ते सत्तेच्या सारीपाटावरील अडीच घरांचे राजा ठरले आहेत. शिवसेनेतील बंडखोर गटाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसरी राजकीय ओळख निर्माण झाली आहे. किंबहुना हा शिक्काच त्यांच्यावर पडला आहे. सत्तेची चक्रे एकप्रकारे उलटी फिरू लागली आहेत. याच शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी आपल्या सत्तेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार केले होते. त्यामुळे शिंदे यांच्यावर नियतीने उगवलेला हा सूड म्हणावा का की, शिवसेनेवर उगवलेला सूड? ज्या शिवसेना-भाजप युतीचे गोडवे महाराष्ट्रासह देशभर गायले जात होते त्याच शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या क्षुल्लक कारणावरून एवढी मोठी दरी निर्माण व्हावी. यावरच न थांबता शिवसेनेत उभी फूट पडावी. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पाहता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता शिंदे यांनी भाजपसमोर नांगी टाकत घेतलेली भूमिका ही शिवसेनेचा बाणा राखणारी म्हणावी का? आजपासून अडीच वर्षांपूर्वी अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपण मुख्यमंत्रिपदाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले होते. हीच वेळ अडीच वर्षांनंतर आता शिवसेनेचेच बंडखोर म्हणून ओळखले जाणारे शिंदे यांच्यावर आली आहे. एकेकाळी शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक तयार झाले. त्यांचा आदरयुक्त दरारा असल्यामुळेच शिवसेनेत आदेश नावाची संस्कृती रुजली. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हाच आदेश मानून शिवसैनिक अन्यायाविरुद्ध पेटून उठत होता व विधायक कामात स्वतःला झोकूनदेखील देत होता. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेली शिवसेना लयास गेली. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना एकनाथ शिंदे असे दोन गट उदयास आले. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एक दिवस शिवसेनेचा कार्यकर्ता विराजमान होईल, हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यातील एका गटाने ज्यांच्या विरोधात शिवसेनाप्रमुख आयुष्यभर लढले त्यांच्यासोबत जाऊन हातमिळवणी केली. दुसऱ्या गटाने बाळासाहेबांना अपेक्षित हिंदुत्वाचे पालन करण्यासाठी पुन्हा युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र अडीच वर्षांचा कालावधी उपभोगता आला. सुरुवातीला बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्या या दोन्ही गटांच्या नेत्यांना आता हळूहळू बाळासाहेबांचा विसर पडताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषद पाहिली असता, त्यांनी एकदाही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उच्चार केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख करत त्यांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, असे सांगितले. ज्या शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हाच आदेश होता आता त्या शिवसैनिकांना मोदी व शहा यांचा आदेश पाळावा लागणार आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांचा दिलदारपणा दिसला. मात्र, त्यामागील हतबलता कोणाला दिसली नाही. पत्रकार परिषद न घेतादेखील शिंदे आपला निर्णय मोदी व शहांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवू शकले असते. पत्रकार परिषदेपूर्वी आपली मोदी व शहा यांच्याशी फोनाफानी झाली, असे शिंदे सांगत होते. मग पत्रपरिषद घेऊन शिंदे यांना कोणता संदेश जनतेला द्यायचा होता की, पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव टाकला होता? महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा हा कळीचा मुद्दा आपसात चर्चा करून मिटला असता. यासाठी पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता का वाटली? विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार दोन दिवसांपासून शिंदे यांच्या भेटीची वाट पाहत होते. मात्र, त्यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात पाठवून विजयोत्सव साजरा करण्याच्या सूचना केल्या. स्वतः मात्र मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधून माघार घेऊन मोकळे झाले. शिंदे यांची ही त्यागाची परंपरा आता महायुतीत अशीच सुरू राहणार की, त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल, हे आगामी काळात ठरेलच. मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असला, तरी राज्यात सत्तास्थापनेसाठी सर्वांना कामगिरीनुसार वाटा दिला जाणार आहे. डोकी दहा आणि टोप्या सहा, अशी परिस्थिती महायुतीत निर्माण झाली आहे. मात्र, ही परिस्थिती भाजपने स्वतःवर ओढवून घेतली आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने कायम आहे. सत्तेत बसलेले आज विरोधात आहेत, तर विरोधात बसलेले सत्तेत आहेत. भाजपकडे बहुमत असले तरी आपणच निर्माण केलेल्या या राजकीय अस्थिरतेचे त्यांना भय वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एखादा अडीच घरांचा राजा निर्माण होऊ नये म्हणजे मिळवले.