सत्ताधाऱ्यांनी केला नियोजनबद्ध प्रचार
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-29 13:28:56
निवडणूक संपली, निकाल लागले, आता राजकीय विश्लेषण, तर्क-वितर्क सुरू झाले आहे. निवडून आलेले व पडलेले दोघेही संभ्रमावस्थेत आहेत. अतिशय चुरशीची आणि अवघड असलेली निवडणूक इतकी सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने सोपी कशी झाली? एवढं मताधिक्य कसे मिळाले? असे प्रश्न जनतेला पडले आहेत. विरोधी उमेदवारांनीही तशीच भावना व्यक्त केली आहे. जनतेच्या मनात नेमके काय होते? तेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीत कौल विरोधात गेल्यावर सत्ताधाऱ्यांनी भानावर येत काही अचूक निर्णय घेतले. ते जनतेत अपील करून जनतेच्या मनात उतरवण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले. त्याचा तत्काळ फायदा महाराष्ट्रात सर्वच घटकांना मिळाला.
सत्ताधारी पक्षाने अत्यंत सफाईदारपणे दोन महिन्यांत जास्तीत जास्त महिलांचे फार्म भरून घेतले. त्यासाठी सर्व यंत्रणा राबवून तीन महिन्यांचे पैसे कोट्यवधी महिलांच्या नावे जमा झाले. कोठलेही आवश्यक निकष न पडताळता फार्म भरणाऱ्या सर्वांना फायदा दिला. कदाचित उद्या सर्व निकष लावून चाळणी केली जाईल, पण आज सर्वांना फायदा होईल, असे बघितले. परिणामी त्यामुळे सर्व महिला वर्ग प्रचंड खूश झाला आणि तिथे त्या खुशीचं मतदानात रूपांतर करून घेण्यात सत्ताधाऱ्यांनी यश मिळविले.
भविष्यात हे सर्व फायदे सुरू राहतील याबद्दल विश्वास निर्माण केला. त्यामुळे महिला झुंडीने मतदानात सहभागी झाल्या आणि एक गठ्ठा मतदान झाले. ते अत्यंत परिणामकारक ठरले. वाढलेले मतदान याचाच भाग ठरला. लाखो शेतकऱ्यांची लाखोंची वीजबिले माफ झाली. यामुळे नाराज शेतकरी तात्कालिक फायद्याने खूश झाला आणि सत्ताधारी पक्षाला मतदान करून मोकळा झाला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उभी करून अशक्य ते शक्य करून दाखवले. सत्ताधारी आपले सर्व कसब पणाला लावून थेट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यात व आपली यंत्रणा राबवून विशिष्ट प्रकारचा प्रचार करण्यात यशस्वी ठरले. याउलट लोकसभेतील अभूतपूर्व विजयामुळे सुस्तावलेले विरोधी पक्ष गाफील राहिले. जागावाटपापासून तर उमेदवार ठरविण्यात केलेला उशीर, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधील तू-तू में मैं आणि त्यांच्यातील घोळ यांमुळे मतदारपण गोंधळलेल्या स्थितीत दिसले. मित्रपक्षांना बरोबर घेण्यात निष्काळजी व गाफीलपणा. त्यामुळे एकास एक लढत न होता अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढतींत मतदारांना भूमिका ठरविण्यात अवघड झाले. परिणामी मोठी मतविभागणी झाली. विरोधी मतांमध्ये विस्कळीतपणा दिसला.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रहार, वंचित, शेतकरी संघटना, अपक्ष यांची मोट बांधून गणित जुळवण्यात विरोधी पक्षनेते सपशेल अयशस्वी झाले. दुसरीकडे, त्यामुळे एकसंध सत्ताधारी एकवाक्यता ठेवून निवडणुकीला सामोरे गेले आणि यशस्वी ठरले. विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर कुरघोडी व एकमेकांविरोधात टीकाटिपण्णी करण्यात, तसेच जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा हव्यास त्यामुळे मित्रपक्षातील योग्य उमेदवार वंचित राहिले. अयोग्य उमेदवारांमुळे हमखास जागा गेल्या, निवडून आलेले खासदार निष्प्रभ ठरले गेले, त्यांनी कठोर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
परिणामी सहा महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरलेले शेतकरी निवडणुकीत वंचित राहिले व सर्वत्र विरोधी वातावरण असताना सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत घवघवीत यश मिळवून निर्विवाद बहुमत प्राप्त केले. देवळा- चांदवड मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न घेऊन पराभूत होऊनही हीरो झाले. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील, एकही रुपया खर्च न करता लोकांनी हाती घेतलेली वेगळी निवडणूक म्हणून भविष्यात ही निवडणूक मार्गदर्शक ठरेल. संपूर्ण शेतकरी व कामकरी, सामान्य कार्यकर्ते एकत्र येऊन अत्यंत साधेपणाने गणेश निंबाळकर ५५ हजार मते मिळवण्यात यशस्वी झाले.
-कुबेर जाधव