आमच्या दोघांमध्ये धर्म आला नाही...

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-29 15:27:16

        जेव्हा मी त्याच्याशी लग्न केलं, तेव्हा प्रत्येक जण म्हणत होता की, तो दिसायला सुंदर आहे. तरुण आहे. हे लग्न पाच महिन्यांहून अधिक काळ टिकणार नाही, पण आता आमच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. आमच्या घरात आज देवाची पूजा केली जाते. मी नमाजपठण करते. आमच्या घरात धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आज आमच्याकडे सर्वकाही आहे. माझे सासरेसुद्धा खूप छान आहेत. तेव्हासुद्धा कोणतेही अडथळे नव्हते, अशा शब्दांत झरिना वहाब यांनी त्यांची व आदित्य पांचोली यांची लव्ह स्टोरी, तसेच त्यांच्या ३६ वर्षांच्या संसारातील अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. 
      एका मुलाखतीत झरिना यांनी सांगितले, की आमचा निकाह झाला, पण त्याने धर्मांतर केले नाही. मुस्लिम प्रथेनुसार त्याला त्याचं नाव बदलावं लागलं. त्याप्रमाणे त्याने नावात बदल केला. आमच्या मुलीचं नाव आम्ही पाकिस्तानी शो पाहून सना ठेवलं होतं. मुलाचं नाव सूरज हे आदित्यच्या एका व्यक्तिरेखेचं नाव होतं. मुलांना कोणती नावं द्यायची यावर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आमच्या दोघांत धर्म कधीच आला नाही. अगदी निर्मलचं (आदित्य यांचे पहिले नाव)सुद्धा हेच मत होतं. माणूस म्हणून तो खूपच छान आहे.
एका चित्रपटात आम्ही एकत्र काम करणार होतो, तिथेच मी निर्मलला पहिल्यांदा भेटले. तो माझ्यापेक्षा लहान होता, आहे.   पण असे असतानाही त्यानंतर अवघ्या १५ ते २० दिवसांत आमचे लग्न झाले, आणि आम्ही ते टिकवले असेही झरिना यांनी पुढे सांगितले.