'अंधश्रद्धा, भांडण, व्यसन... याशिवाय घरात काहीही नव्हते'

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-30 15:07:29

सैराट, फँड्री, घर बंदूक बिर्याणी, झुंड यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या, आशयसंपन्न, तसेच संवेदनशील विचारांचा प्रसार करणाऱ्या चित्रपटांसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे ओळखले जातात. त्यांच्या 'सैराट'ने तर मराठी चित्रपटसृष्टीतील सारे विक्रम मोडीत काढले. पण मंजुळे यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता. अत्यंत सर्वसाधारण घरात जन्मलेल्या मंजुळे यांनी समाजव्यवस्थेवर कोरडे ओढत स्वत:च्या विचारांची पायाभरणी केली. याबाबत त्यांनी पुण्यात समता पुरस्कार स्वीकारल्यानंतर कबुली दिली.  अंधश्रद्धा, भांडण, व्यसनाधीनता याशिवाय आयुष्यात काहीही नव्हते. आज माझे वडील हयात नाहीत. माझी आई माझ्या वडिलांची सतत आठवण काढते. माझे वडील दगड फोडायचे, घर बांधण्याचे काम करत होते. माझ्या वडिलांना महापुरुषांशी काहीही देणं-घेणं नव्हतं. त्यांचे छोटे-छोटे देव होते. खूप अंधश्रद्धा होती. त्यांचे आपापले समज होते. स्वत:च्या जुन्या, अनिष्ट रुढी-परंपरांच्या विचारांच्या चिखलातच अडकलेले हे सगळे लोक होते. अशा घरात मी जन्मलो होतो. मी वडिलांशी भांडून घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला. माझ्याकडे महात्मा फुलेंचा फोटो नव्हता. मी फुलेंचे पेन्सिलने चित्र काढले होते. हे चित्र काढताना मी माझ्या वडिलांना म. फुलेंनी काय काय केलं, हे सांगायचो, असे मंजुळे यांनी सांगितले.