चुकीच्या निदानामुळे गेला तिशाचा जीव
आई तान्या सिंह यांचा आरोप
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-30 15:10:17
अभिनेता व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा हिचे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाले. तिच्या मृत्यूचे कारण कर्करोग होते, असे तेव्हा सर्वत्र सांगितले गेले. अनेकांनी कृष्ण कुमार यांचे सांत्वन केले. त्यांच्यासाठी तिशाचे अकाली जाणे, हा मोठा धक्का होता. आपल्या मुलीचा असा मृत्यू स्वीकारणे त्यांना खूप कठीण गेले. तिच्या निधनानंतर काही महिने उलटल्यानंतर आता कृष्ण कुमार यांच्या पत्नी व तिशाच्या आई तान्या सिंह यांनी मुलीच्या आजारासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. सर्वांचा समज झाला की, तिशा कॅन्सरने गेली, पण प्रत्यक्षात असे नाही. आपल्याकडची वैद्यकीय यंत्रणा दिवसेंदिवस किती बोगस होत चालली आहे, याचा अनुभव आम्हाला तिशाच्या उपचारादरम्यान आल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपासून मला सगळेच जणं हे कसं होऊ शकते? तिशाला नेमका कधी झाला कर्करोग? असे विचारताहेत. म्हणूनच मी बोलायचे ठरवले, असे सांगून वैद्यकीय सोयी-सुविधा देणाऱ्या यंत्रणांच्या जाळ्यात आम्ही अलगद अडकलो. मी जे काही सांगतेय त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सत्य हे आहे की, माझ्या मुलीला सुरुवातीला ‘कर्करोग’ झाला नव्हता, असे तान्या यांनी म्हटले आहे. ती १५ वर्षांची असताना तिला एक लस देण्यात आली होती. त्यामुळे कर्करोगासारख्या अन्य रोगांवर मात करण्याची रोगप्रतिकारक क्षमता तिच्यात निर्माण झाली होती. मात्र, उपचारावेळी चुकीचे निदान करण्यात आले. त्यावेळी आम्हाला हे काहीच माहीत नव्हते.
माझी मुलगी प्रत्येक स्थितीत खंबीर होती. ती कधीच घाबरली नाही. ती सर्वांत निर्भीड, धाडसी आणि शांत मुलगी होती. तिला सर्वांना सांगायचं होतं की, कधीच कोणत्याही वैद्यकीय निदानाला घाबरू नका. बायोमेडिसिनच्या मदतीने केमो साइडइफेक्ट्सवरही मात करता येते, हे तिला सर्वांना दाखवून द्यायचे होते. एखादा निष्पाप जीव चुकीच्या गोष्टींमुळे अडकतो आणि अचानक समजतं की, आता फार उशीर झाला आहे, पण शेवटी देवाच्या दारात प्रत्येकाला समान न्याय असतो आणि त्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही, अशा भावना तान्या यांनी व्यक्त केल्या आहेत.