सुभाषनगरला घरगुती गॅसचे ‘रिफिलिंग’
ग्रामीण पोलिसांकडून छापा; १३६ सिलिंडरसह ११ लाखांचे साहित्य जप्त
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-12-02 16:29:45
लोकनामा प्रतिनिधी
देवळा : तालुक्यात गुंजाळनगर ते सुभाषनगर परिसरात बेकायदा घरगुती गॅस रिफिलिंग करणाऱ्या केंद्रावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १३६ गॅस सिलिंडर, दोन चारचाकी वाहने व गॅस रिफिलिंगचे साहित्य असा एकूण ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घरगुती गॅस अवैधरित्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये रिफिलिंग केला जात असल्याने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदारांनी शुक्रवारी (ता. २९) वरील ठिकाणी छापा टाकला. त्यात संशयित भागवत कारभारी जाधव (वय ४२, रा. सुभाषनगर, रामेश्वर फाटा, देवळा) हा घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना आणि मानवी जीवितास धोकादायक ठरेल, अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत घरगुती वापराचे १०१ गॅस सिलिंडर, व्यावसायिक वापराचे निळ्या रंगाचे ३५ गॅस सिलिंडर असे एकूण १३६ गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटार तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण ११ लाख १५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, मालेगावचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, हवालदार सुधाकर बागूल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी यांच्या पथकाने ही
कारवाई केली.