बप्पीदा बिना चैन कहाँ रे...
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-02 17:05:05
पूर्वी बॉलिवूडमध्ये एक जोक होता. मढ आयलंडला म्हणे एक बोट फुटली न् त्यातून सोनं आणि पाश्चात्य म्युझिकच्या कॅसेट्स मिळाल्या. दोन्ही वस्तू एकाच माणसाच्या मालकीच्या होत्या, अलोकेश लाहिरी ऊर्फ बप्पी लाहिरी यांच्या!
बप्पीदाने ऐंशीचा काळ गाजवलाय इंडस्ट्रीमध्ये, तो गरिबांचा आरडी होता आणि आरडीची गरीब कॉपीसुद्धा होता. बऱ्याच वेळेला त्याने दुसऱ्यांची गाणी बिनधास्त उचलली. आशाताईंचा ओरडा खाऊनसुद्धा त्याने आरडीचं गाणं आशा -ताईंना गायला लावलं होतं. मागणी तसा पुरवठा करण्याचं त्याचं कसब आणि स्थान अबाधित ठेवण्यासाठी बप्पी दाने मूळ गाण्यांवर संस्कार वगैरे करणं अशा क्षुल्लक गोष्टींत अजिबात वेळ घालवला नाही. त्याचे पूर्वसुरी आरडी, एसजे, एलपी यांच्या उचल्या कळून घेण्यास वेळ लागत असे. मात्र, बप्पीदाने प्राकृत वर्गासाठी मोठ्या मनाने पाश्चात्य संगीताची पिंप रिती केली. त्याच्या सुदैवाने आरडीने पाश्चिमात्य संगीताचा कान तयार करून ठेवला होता इथल्या सिनेसंगीत रसिकांचा. त्यामुळे त्याचं ढुक चीक ढुक चीक म्युझिक देमार हिट होऊ लागलं. त्यात तो किशोर कुमारचा नातेवाईक. किशोर मामा म्हणायचा तो किशोरला आणि किशोर ही त्याच्यासाठी ‘झोपडी में चारपाई’ किंवा ‘आ आ उ आ ए ए ए’ अशी गाणी गायचा (मग स्वतःला कोसायचा)... बप्पीने आरडी, एलपी या दोन संस्थानांचं मार्केट त्या दहा वर्षांत हलवून टाकलं.
नंतरच्या काळात मात्र आनंद- मिलिंद, जतीन-ललित, नदीम- श्रवण, मलिक यांनी ट्रेंडच बदलला, पण तोपर्यंत मात्र बप्पीदाने आपला एक छोटासा पंथ सुरू केला होता. बी. सुभाष आणि मिथुन असतील तर तो डिस्को डान्सर, कसम पैदा करने वाले की, डान्स डान्स अशा आयकॉनिक नृत्य विशेष चित्रातून तो बरं संगीत द्यायचा. तिथून मग तो चक्क अमिताभसारख्या सुपर स्टारसाठी संगीत द्यायला गेला, तेंव्हा त्याने आपली ठेवणीतली अस्त्र काढली व ‘इंतेहा हो गयी इंतजार की’, ‘के पग घुंगरू बांध मीरा नाची थी’, ‘आज रपट जैय्यो’ अशी एव्हरग्रीन गाणी दिली. बप्पी दाचं हे असं आहे. मुंबईला आम्ही चोर बॉडी म्हणतो, म्हणजे एखाद्या माणसाचं शरीरसौष्ठव छान असतं, पण लीन बॉडी असल्याने फक्त ती शर्ट काढल्यावर दिसते तसा बप्पी दा हा चोर टॅलेंट (तसा चोर संगीतकार होताच तो) असलेला माणूस आहे.
बप्पीदाची चांगली गाणी खूप आहेत. फक्त झोल असा आहे की, त्याची कॉपीड गाणी जास्त गाजली. त्याच्या सुरुवातीच्या ‘आपकी खातीर’मधलं बंबई से आया मेरा दोस्त.. हे तर अजूनही पिकनिकसाठी फेव्हरेट गाणं असावं. बप्पीदा एक उत्तम तबलावादक आहे. त्याचा आवाज गोड आहे (आधी आधी तर उषा उथ्थुप गाताहेत की बप्पीदा हेच कळायचं नाही.) पण गाण्यात ड्यांस असा शब्द आला की, ते गाणं फिक्स बप्पीदाचं असतंय. मला बप्पीदाची मिथुनसाठी गायलेली गाणी चिक्कार म्हणजे आसेतु हिमाचल आवडतात. ‘देखा है मैने तुम्हे फिर से पलट के’, ‘मौसम है गाने का गाने का बजाने का’, ‘ये जीवन ये दुनिया सपना है दिवानी का’... बप्पीदाची गाणी जबडा पसरट करून म्हणायची1. ‘कहा हम कहा तुम हुवे तुम कहा गुम आभि जाय आभि जाय एकही बार’...
मस्त माणूस आहे हा. सोन्याने मढलेला आणि त्यावर होणारी थट्टा हसून मजेत घेणारा आपला बंगाली मोदक. नम्र आहे, हसमुख आहे आणि पब्लिकची नस ओळखतो. त्याचं सॅमंथा फॉक्स (ओह माय गुडनेस) बरोबर गोंद्यासाठी केलेलं गाणं ऐकलंय का? ‘डार्लिंग तुमसे मिल्ने का था बना लिया प्रोग्रॅम’ (बंगाली असल्याने पडोगडॅम असं होतं) किंवा गोंद्याच्याच 'दो आँखे बारा हाथ'मध्ये ‘तेरे बाप को मैनें देखा बांद्रा स्टेशन पे तो बोला अंकील नमस्ते’ ही गाणी जाळ न् धूरसंगती हायेत. काय लिहू या माणसाविषयी? बऱ्याच काळाने जेव्हा बंबई नगरिया ऐकलं होतं (त्यालाही बराच काळ झाला.) तेव्हा इतकं मस्त वाटलं होत. यार... तुला कितीही चिडवलं तरी आमच्या पिढीतल्या मुला-मुलींमध्ये हार्डली कोणी असेल जो हे गाणं लागलं तर आमच्या देसी ब्रेक ड्यांस मुव्ह्ज करणार नाय...
यार हमें पैसा नहीं प्यार चाहिए
कोई मनचाहा दिलदार चाहिए
हीरे मोतियों से जहाँ दिल ना तुले
सपनों का ऐसा संसार चाहिए
ये भी होगा थोड़ा इंतजार कर ले
बप्पीदा बिना चैन कहाँ रे...
(सोशल मीडियावरून साभार)