अखंड लाकडात कोरलेली काथवट

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-12-02 17:08:04

माझ्या अलीकडच्या अनेक लेखांमध्ये, आता संग्रहालयात रवाना झालेल्या, नामशेष झालेल्या, जुन्या काळातील दुर्मिळ अनेक वस्तूंची माहिती आपण करून घेतली. अनेक मित्रांनी मला ‘काथवट’ (किंवा काटवट) या वस्तूची माहिती देण्याचे सुचविले. त्यासाठी हा लेखनप्रपंच!
         पूर्वी आपल्या स्वयंपाकघरामध्ये बहुतेक सर्व वस्तू या माणसांसारख्याच धडधाकट असायच्या. तांबे, पितळ, कांसे, लोखंड यांच्या बरोबरीने लाकूड आणि मातीपासून बनविलेल्या अनेक वस्तू असत. पोळ्या, पुऱ्या, फुलके, पापड, थेपले यांच्यासाठी पोळपाट लाटणे सज्ज असायचे. थालीपीठ, धपाटे यांचा नूरच न्यारा! तर घावन, पाटोळ्या, धिरडे, पानग्या यांची मिजास आणखीनच वेगळी. या सर्वांवर कडी म्हणजे भाकरी! सर्वसामान्य शेतकरी, संतांपासून ते परमेश्वरापर्यंत सर्वांना प्रिय असलेली भाकरी हा आपल्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. 
          त्यासाठी चूल, तवा आणि विशेष परात एवढा संच पुरेसा असे. बाकी सगळी मदार भाकरी बनवणाऱ्या अन्नपूर्णेवर असे. ही विशेष लाकडी परात म्हणजेच काथवट किंवा काटवट! या परातीला दोन बाजूंना कान असत. अनेकदा ही काथवट एकाच अखंड लाकडातून कोरलेली असे. काष्ठवत या संस्कृत किंवा काठवती (पुत्रवती, सौभाग्यवती तशी काठ असलेली काठवती) या शब्दाशी काथवट किंवा काटवट शब्दाचा संबंध असावा. सोबत माझ्याकडील काथवटीचा दिलेला फोटो पाहावा. अनेकदा या काथवटीत प्रत्येक वेळी एका भाकरीपुरते पीठ घेऊन भिजवले जात असे. नंतर त्याचा गोळा थापून थोपटून भाकरी थापली जात असे. त्यावरून अनेकदा पाण्याचा हात फिरवला जात असे. भाकरी थापल्यावर ती उचलून दोन हातांवर फिरविली जात असे. मग तिची तव्यावर रवानगी व्हायची. तव्यावर टाकताना हातही भाजत असे. त्यामुळेच कवयित्री बहिणाबाईंना ‘आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ हे काव्य सुचले असावे. आधीच भाकरी म्हणजे रांगडा पदार्थ आणि त्यात ती बनविण्याची कृतीही त्याला साजेल अशी! सोबतच्या फोटोतील कासवाच्या आकाराची  काथवट ही चक्क दोन फूट लांब असून, तिचे वजन चार किलो आहे. ती उचलणे, फिरविणे यालाच किती ताकद लागत असेल! भाकऱ्या थापताना मोठा आवाज येत असे. त्यामुळे ‘भाकऱ्या बडविणे’ असा वाक्प्रचार रूढ झाला. हे सर्व सोपस्कार एकटीने सांभाळणारी स्त्री चांगलीच शक्तिवान असली पाहिजे!
            नंतर या काथवटीची जागा धातूच्या परातीने घेतली. परात ही वस्तू अनेक कामांसाठी उपयुक्त ठरत होती. पीठ मळण्याचे सर्वांत महत्त्वाचे काम, या परातीमुळे सुलभ झाले. गरजेनुसार विविध आकाराच्या पराती निर्माण झाल्या. थंड प्रदेशांमध्ये काही ठिकाणी परातीत चक्क चहा ओतून प्यायला जातो. प्रचंड मोठ्या पराती या लाडू वळण्यासाठी, पंगतीचे पदार्थ बनविण्यासाठी वापरतात. इतकेच काय, पण बोडणासारख्या अगदी धार्मिक विधींसाठीसुद्धा वापरल्या जातात. परातीमुळे काथवटीचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. आधुनिक फूड प्रोसेसरमुळे परातीची रवानगीही आता जुन्या वस्तूंच्या संग्रहालयात झाली आहे. 

-मकरंद करंदीकर