चामड्याऐवजी आता सिंथेटिक तबला !

मिरजेत निर्मिती, वातावरण बदलाने बिघडणारा ताल दुरुस्त

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-02 17:57:54

सांगली  : गायकाचे गाणे ऐन रंगात आले असतानाच तबल्यातून ताल सुटला, तर गायकाचे गाणे बेताल होते. हा बेतालपणा कायमचा दूर करण्यासाठी वाद्यनगरी असलेल्या मिरज येथील   विजय व्हटकर या चर्मवाद्य कारागिराने चामड्याचा वापर न करता  वातावरणाचा कोणताही परिणाम टाळणाऱ्या  सिंथेटिक तबल्याची निर्मिती केली आहे. चर्मवाद्यातील या क्रांतिकारी यशाने तबल्यावरील कलाकारांचे ताक-धिना-धिनचे ताल हे आता अखंडित राहत संगीत मैफली सजवतील. व्हटकर यांनी या तबल्याचे स्वामित्व हक्कही मिळवले आहे.
             व्हटकर यांनी तबल्यासाठी सिंथेटिकचा वापर करण्याचा प्रयत्न गेल्या अडीच वर्षांपासून सुरू केला. सुरुवातीस त्यावर शाई टिकत नसल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे पुन्हा नवीन प्रयोग करत त्यांनी विविध प्रकारच्या रसायनांचा वापर करून शाई तयार केली. यात यश येत शाई निघण्याच्या धोक्यावरही त्यांनी मात केली.
            पारंपरिक चामड्याच्या तबल्यातून निघणारा ध्वनी किमान पाच ते नऊ आस (सेकंद) असतो. या नव्या तबल्यामध्ये हाच ध्वनी १७ आस मिळत आहे. एकदा तबला लावला, की तो पुन्हा लावावा लागत नाही. लावलेला ध्वनी कायम राहतो. त्यामुळे गायकाच्या गायनात व्यत्यय येत नाही. व्हटकर यांनी बनवलेल्या या नव्या पद्धतीच्या तबल्याला ख्यातकीर्त तबलजींकडूनही दाद मिळत आहे. या तबल्याचे स्वामित्व हक्कही व्हटकर यांनी मिळवले
आहेत.
              तालयोगी पद्मश्री सुरेश तळवळकर यांनी नुकतीच व्हटकर यांच्या तबलानिर्मिती केंद्राला भेट देऊन सिंथेटिक तबल्याची चाचणी घेत नवनिर्मितीचे कौतुकही केले. त्यांनी दिवसभर केंद्रात थांबून ध्वनी कसा लागतो, किती काळ टिकतो याची चाचणी घेत काही तबले, पखवाज यांची खरेदीही केली. या वेळी त्यांच्यासमवेत राजप्रसाद धर्माधिकारी, शिष्य आशय कुलकर्णी, कृष्णा साळुंखे  उपस्थित होते.