उशिरा सुचलेले शहाणपण

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-03 11:32:31

वाढते अपघात व तांत्रिक दोष समोर आल्याने एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या अपघातांना कारणीभूत ठरवून या बसवर सेवा बजावणाऱ्या चालक व वाहकांवर करण्यात आलेली कारवाईदेखील एसटी महामंडळ मागे घेणार आहे का? एखाद्या चालकाला तांत्रिक दोष असलेली बस चालविण्यास देणे व त्या बसचा अपघात झाल्यास कारवाई करणे, कितपत योग्य समजायचे? संबंधित चालक-वाहकांवर करण्यात आलेली कारवाई एसटी महामंडळाचा तांत्रिक दोष असल्याचे एकप्रकारे सिद्ध होत आहे. गोंदिया येथे शिवशाही बसला अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर या बसमध्ये तांत्रिक दोष असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. ही अक्कल एसटी प्रशासनाला अगोदरच यायला हवी होती. शिवशाही बसेस का आणल्या, कशा आणल्या, कशासाठी आणल्या व त्याचे लाभार्थी कोण? या घटनेत एसटीने काय कमावले? काय गमावले? याचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे, अशी उघड चर्चा आता एसटी महामंडळाचे कर्मचारी करू लागले आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्लीपर कोच, शिवशाही, इलेक्ट्रिकसह सर्व प्रकारच्या सुमारे १५ हजार ६०० च्या जवळपास बसेस आहेत. त्यात ८९२ शिवशाही बसेस असून, ५०० बस रस्त्यावर धावत आहेत. ३९२ बसेस वर्कशॉपमध्ये आहेत. म्हणजेच तांत्रिक कारणामुळे या बसेस बंद आहेत. राज्यात अनेक ठिकाणी याआधी शिवशाही बसचे अपघात झाले आहेत. बसमध्ये तांत्रिक दोष असल्याचेही आढळले होते. मात्र, तरीही शिवशाहीचा प्रवास सुरू होता. सुरुवातीला खासगी गाड्यांप्रमाणे आरामदायी वाटणारी ही सेवा तिच्या बकाल रूपामुळे प्रवाशांना नकोशी वाटू लागली. खरेतर खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या एसटीला ‘लालपरी’ असे गोंडस नाव दिले असले, तरी तिचे बकाल रूप पाहता तिला लाल डबा असे उपहासात्मकपणे म्हटले जाऊ लागले. अशीच काही अवस्था किंवा याहीपेक्षा अधिक घाणेरडी अवस्था या शिवशाही बसेसची झाली होती. ही गाडी वातानुकूलित असली, तरी तिच्या बाकड्यांची दुरवस्था पाहता या बसमध्ये बसण्यास प्रवाशांनी नंतर नकार देण्यास सुरुवात केली होती. एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघातांचे प्रमाण ०.१७ टक्के आहे. म्हणजे सहा लाख किलोमीटरमागे एका अपघाताची नोंद होते. यात शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण ०.२९ टक्के आहे. म्हणजे प्रत्येक ३ लाख ५० हजार किलोमीटरमागे एक अपघात नोंदवला जात आहे. त्यामुळे शिवशाही बसने प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचा आरोप एसटीतील कामगार संघटनेकडून केला जात होता. शिवशाही बससेवेचे सुमारे सहाशेच्या वर अपघात झाल्याचे समजते. ही शिवशाही बसवर महामंडळाचा लोगो असला, तरी यातील अर्ध्या बस या खासगी तत्त्वावर चालविण्यात येत होत्या. महामंडळाच्या ताफ्यात या खासगी शिवशाही बसेस का आणल्या, कशा आणल्या, कशासाठी आणल्या व त्याचे लाभार्थी कोण? याचीही चौकशी आता व्हायला हवी. केवळ तांत्रिक दोष म्हणून ही सेवा बंद करण्यात येणार असेल तर महामंडळाला या बसमधील तांत्रिक दोष आत्ताच का लक्षात यावेत. गोंदिया येथील अपघात व यातील बळींची संख्या पाहता एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्याचे लक्षात आले आहे. एसटी महामंडळ हा शासनासाठी पांढरा हत्ती समजला जातो. हे महामंडळ नेहमी तोट्यातच असते. त्यामुळे येथील कामगारांच्या मागण्यांकडे शासनाकडून वारंवार कानाडोळा केला जातो. पण प्रत्यक्षात पाहिले तर एसटी महामंडळ हे महाराष्ट्रातील खेड्यांना जोडणारी धमनी आहे. ज्याप्रमाणे मानवाच्या शरीरात धमन्यांचे जाळे पसरले आहे त्याप्रमाणेच एसटीचे जाळे महाराष्ट्रासह देशभर पसरले आहे. आजही खेडोपाडी एसटी हेच प्रवासाचे साधन आहे. मात्र, राजकारण्यांनी एसटीला खेळणे बनवले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी सत्ताधारी विशिष्ट वर्गाच्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी सवलतींची खैरात वाटतात. त्यामुळे एसटीचे अर्धे प्रवासी हे शासनाच्या विविध योजनांमुळे ‘फुकटे’ ठरतात. या ठराविक प्रवाशांना एसटीत सवलती मोठ्या गाजावाजा करून दिल्या जातात. मात्र, त्याच तत्परतेने या प्रवाशांच्या रूपाने दिले जाणारे कोट्यवधींचे अनुदान शासनाकडून देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे प्रवासी तुपाशी अन्‌ एसटी कर्मचारी उपाशी, अशी परिस्थिती निर्माण होते. आता इंग्रजी नववर्षारंभ सुरू होईल. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळीचा बोनस मिळालेला नाही. त्याला कारण हे शासकीय अनुदानच आहे. शिवाय यावर्षी निवडणुकांमुळे एसटीची हंगामी भाडेवाढ टळल्याने महामंडळाला लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. गत तीन वर्षांपासून एसटीने भाडेवाढ न केल्याने एसटीची चाके अधिकच आर्थिक गर्तेत गुंतत चालली आहेत. ज्येष्ठांना फुकट प्रवास, महिलांना भाड्यात ५० टक्के सवलत या योजना एसटीच्या नाही, तर राजकारण्यांच्या सुपीक डोक्यातील आहेत. एसटी महामंडळ स्वायत्त म्हणून गणले गेले असले, तरी त्यांची स्टेअरिंग मात्र सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. आपल्या फायद्यासाठी सत्ताधारी हे स्टेअरिंग पाहिजे तिकडे वळवतात. एसटी तोट्यात जाऊ लागली की, दोष महामंडळाला देतात. शिवशाहीत तांत्रिक दोष असतील, पण ही खासगी सेवा एसटीत आणणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध एसटी महामंडळाने शोधणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे सार्वभौमत्व जपले गेले पाहिजे. त्यात वारंवार राजकारण्यांचा हस्तक्षेप झाल्यास त्याचे खासगीकरण होण्यास वेळ लागणार नाही. असे झाले तर प्रवासी एसटीपेक्षा आपली दुचाकी बरी, असे म्हणत एसटीपासून कायमचे दुरावले जातील.