महायुतीची मुंबईतील बैठक पुन्हा रद्द
शिंदेंना डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-03 12:09:53
मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावातून ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे. तसेच आजच्या इतर सर्व बैठकादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे सर्व बैठका रद्द करण्यात आल्याचे समजते.
दिल्लीतील बैठकीनंतर सोमवारी (दि. २) एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का?, एकनाथ शिंदेंनी मागितलेले गृह खाते शिवसेनेला मिळणार का?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार?, याबाबत चर्चा होणार होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठकदेखील आता लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेना आमदारांची बैठकही बोलावली होती.
या बैठकीत मुख्यमंत्रिपद, मंत्रिपदांचे वाटप, महायुतीतील सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करणार होते. महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १३ मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली जाणार असून, मंत्रिमंडळात शिवसेनेकडून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होईल? यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे.
अद्यापपर्यंत आमदारांना बैठक केव्हा होईल? याबद्दल कुठलाही निरोप नाही. शपथविधी ५ डिसेंबरला होईल, हे निश्चित झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक दोन किंवा तीन डिसेंबरला होईल, अशी शक्यता होती. मात्र, अद्यापपर्यंत आमदारांना त्या संदर्भात निरोप नसल्याने बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत. भाजपची विधिमंडळ पक्षनेता निवडीची बैठक उद्या दुपारनंतर किंवा चार डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. पाच तारखेला शपथविधी होणार असल्याने एक दिवस आधी ४ तारखेला विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आमदार मतदारसंघात आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विधिमंडळ पक्षनेता निवड शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या एक दिवस आधी करण्याचा भाजपचा मानस असल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन तसेच पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी ‘सागर’वर दाखल झाले आहेत. मिसाळ, पाटील, नार्वेकर, महाजन यांची नावे मंत्रिपदासंदर्भात चर्चेत आहेत.
दिल्लीतील अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिंदे यांचा चेहरा पडला होता. मात्र, दरे गावातील मुक्कामानंतर शिंदे यांच्या देहबोलीतील आत्मविश्वास पुन्हा दिसू लागला आहे. शिंदे यांनी रविवारी (दि. १) साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका ठामपणे मांडली होती.
सीएम म्हणजे फक्त चीफ मिनिस्टर नव्हे, तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन व जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. अडीच वर्षात जेवढ्या योजना राबवल्या, तेवढ्या कोणीही राबवल्या नसतील. माझ्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोबत होते. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकोपयोगी योजना राबवल्याने व महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याने जनतेने भरभरून मते दिली, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या माध्यमातून शिंदे यांनी महायुतीच्या यशात आपलाही मोठा वाटा असल्याची गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्याला सत्तेतही मोठा सहभाग अपेक्षित असल्याची अपेक्षा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. शिंदे यांची एकूण देहबोली पाहता आता ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत, अशी चर्चा रंगली आहे.
अमित शहांनी मागितले संभाव्य मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागविल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीचे इमानेइतबारे काम केले होते का?, याचा विचारही मंत्रिपद देताना करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली. मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केले?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत शहा यांनी रिपोर्ट कार्ड मागवले आहे. केंद्र व राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केले का? या मुद्यांचे रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना शहा यांनी दिल्लीत बोलावले आहे.