मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष शरद पवार
सत्तर वर्षांनी दिल्लीत रंगणार सोहळा
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-03 12:17:58
मुंबई : सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार असतील.
दिल्लीत यापूर्वी १९५४ मध्ये ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ७० वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नितीन गडकरी यांनाही आमंत्रित केले आहे.
दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे, या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती असवी, असा संयोजक समितीने प्रयत्न केला. त्यातूनच शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे, अशी संस्थेने विनंती केली, ती त्यांनी मान्य केली.
शरद पवार केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेलेले आहेत. त्यांनी औरंगाबाद (२००४), नाशिक (२००५), चिपळूण (२०१३) आणि सासवड (२०१४) येथील साहित्य संमेलनाचे उद््घाटन केले आहे. १९९० मध्ये त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे, असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते. मात्र, त्यावर्षी ते होऊ शकले नाहीत. दिल्लीत महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रित असते त्यातून सर्वांत ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवामुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा व संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी व सुनीताराजे पवार, तसेच संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.