कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही : डॉ. अद्वय हिरे

विरोधकांच्या अफवांना पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-03 12:24:05

लोकनामा प्रतिनिधी

मालेगाव : निवडणूक संपली असली, तरी ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अंगावर घेऊन लढली, त्या कार्यकर्त्यांचा काळ येणार आहे. जे माझ्यासाठी तन-मनाने लढले, अगदी पैसे गोळा करून लढले त्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यांच्यासाठी आगामी काळात येणाऱ्या निवडणुका तेवढ्याच ताकदीने आम्ही लढवणार आहोत, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी केले आहे. ते विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलत होते.    

         गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे हिरे घराण्याविषयी अनेक अफवा पसरविल्या जात होत्या. त्या अफवांना सडेतोड उत्तर देण्यासाठी डॉ. हिरे यांनी समाजश्री प्रशांतदादा हिरे सभागृहात सोमवारी (दि. २) दुपारी पत्रकार परिषद घेतली. डॉ. हिरे पुढे म्हणाले की, माझ्याविषयी ज्या काही अफवा परसविल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून माझा परिवार मालेगावला राहताे. मी जन्मापासून मालेगावी राहतो आणि मरेपर्यंत मालेगाव शहरातच राहणार. मालेगावच्या लोकांबरोबर मी आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच राहतात. पराभवांना घाबरून खचून जाणारा नेता मी नाही. ज्या लोकांनी मला मतदान केले त्या लोकांचा मी ऋणी आहे. आताच्या महाराष्ट्रात आलेल्या राजकीय त्सुनामीमध्ये अनेक मुख्यमंत्रिपदाचे नेते पराभूत झाले. त्यात मी माझा पराभव मान्य करतो, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या अफवांमधील फोलपणा दाखवून दिला.हे अंतिम सत्य आहे की, पाच वर्षांत सत्य बदलू शकत नाही. ते सत्य स्वीकारून आपण काम केले पाहिजे. कुठल्याही सभेला मी पैसे देऊन लोक आणलेले नाहीत, याचा मला अभिमान आहे. ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी तळमळीने काम केले, इतक्या तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आपल्या राजकीय जीवनात पाहिलेले नाहीत.

       येथून पुढच्या काळात मालेगावच्या जनतेच्या सोबत आम्ही आहोत. आम्ही पक्ष बांधणीच्या दृष्टीने काम करत राहू. महिन्याचे किमान २० दिवस मी मालेगावात राहतो. रोज कृषी उत्पन्न बाजार समितीत लोकांना भेटतो. आगामी काळात बाजार समितीच्या माध्यातून अधिकाधिक लोकांचे काम करत राहणार आहे. मी राजकारणात थांबलेलो नाही, असे आश्वासन डॉ. हिरे यांनी तालुक्यातील जनतेला दिले. उपनेते डॉ. हिरे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मालेगावकरांसमोर आल्याने त्यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा किंवा अफवा या विरोधकांनी पसरविल्या असण्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले. पत्रकार परिषदेस धुळे लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी आमदार अशोक धात्रक, पवन ठाकरे, कैलास माळी आदी उपस्थित होते.

‘अजितदादांशी अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध’

यावेळी काही पत्रकारांनी महात्मा गांधी विद्यामंदिरचे समन्वयक मा.आ.डॉ. अपूर्व हिरे यांच्या अजितदादांना भेटीमागचे कारण विचारले असता, उपनेते हिरे यांनी आमचे आणि अजितदादांचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. कामानिमित्त त्यांची काही भेट झाली असेल, त्यात गैर असे वाटण्यासारखे काही नाही. मी जे काही काम करतो त्यामुळे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांकडे जाऊन आम्हाला काम मागावेच लागणार आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी जे सरकार राज्यात आहे ते सरकार आमचेसुद्धा मायबाप आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काम घेऊन जावेच लागणार आहे. आज मी बाजार समितीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. ते मंजूर करण्यासाठी आगामी सरकारमध्ये होणाऱ्या पणनमंत्र्याच्या दारात मला जावेच लागणार आहे. मला जनतेने जी जबाबदारी दिली आहे, ती पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना भेटावेच लागणार आहे.