'एकवीसशे रुपयांची वाढीव रक्कम भाऊबीजेलाच'

सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-03 12:40:34

मुंबई : राज्यात पुन्हा सत्ता आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये देऊ. असे आश्वासन महायुतीने दिले होते. राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे. मात्र, महिलांना २१०० रुपये मिळण्यास सात ते दहा महिने लागू शकतात, असे दिसते. 
         निवडणुकीआधी राज्य सरकारने जाहीर केले होते की, नोव्हेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुलाखतीदरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेले आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखठोक भूमिका मांडली. मुनगंटीवार म्हणाले की, महिलांना २,१०० रुपये देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करू. सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की, आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै? कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.